Akola News: 21 वर्षीय तरुणांने गळफास घेत आयुष्य संपवलं; गावकऱ्यांचा पोलिसांवरच गंभीर आरोप

पातुर तालुक्यातील गावंडगाव ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि गावकऱ्यांनी अनेकदा पोलिसांकडे अवैध दारू बंद करण्यासाठी तक्रार केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट,अकोला

अकोल्याच्या पातूर तालुक्यातील गावंडगावात येथे एका 21 वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गावकरी, विशेषत: महिलांचा आरोप आहे की पोलिसांच्या छत्रछायेखाली अवैध दारू विक्री उघडपणे सुरू आहे. गावात सहज दारू मिळते आणि तक्रार करणाऱ्यांची नावेच विक्रेत्यांना सांगून त्यांना धमक्या व शिविगाळ केली जाते, असा आरोप गावकऱ्यांनी केला.

दरम्यान, पातुर तालुक्यातील 21 वर्षीय गावंडगाव येथील रुपेश ज्ञानदेव राठोडने गावाच्या शेवटी असलेल्या घराजवळ साडीच्या दोऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या युवकाच्या आत्महत्येनंतर पोलीस आणि दारू विक्रेतांवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

(नक्की वाचा-  कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस; 'मतचोरी'च्या आरोपांवर मागितले पुरावे)

सरपंचासह गावकऱ्यांनी अनेकदा केल्या तक्रारी

पातुर तालुक्यातील गावंडगाव ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि गावकऱ्यांनी अनेकदा पोलिसांकडे अवैध दारू बंद करण्यासाठी तक्रार केली. मात्र दारूचा धंदा बंद झालाच नसल्याचं गावकऱ्यांच म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी ही आत्महत्या कर्जबाजारी आणि नैराश्यातून झाली असल्याचं म्हंटलं आहे. तर अवैध दारू विरुद्ध वेळोवेळी पोलीस कारवाई करत असल्याचंही ठाणेदार रवींद्र लांडे यांचं म्हणणं आहे.

(नक्की वाचा- Sanjay Raut: जगदीप धनखड कुठे आहेत? सुरक्षित आहेत का? संजय राऊतांनी का व्यक्त केली चिंता?)

पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी ग्रामस्थांची मागणी

अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ‘मिशन उडान' अंतर्गत व्यसनमुक्तीसाठी कारवाई सुरू आहे. मात्र गावकऱ्यांच्या मते ग्रामीण भागात त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. या उलट ठाणेदारच या मिशनला सुरुंग लावत असल्याचा आरोप आता गावकरी करत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांचा ' मिशन उडान ' ग्रामीण भागात ' उडान'भरणार का हे पाहणे आता महत्वाचे राहणार आहे.

Advertisement

Topics mentioned in this article