योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोल्याच्या पातूर तालुक्यातील नांदखेड फाटा येथे बनावट सोन्याच्या नाण्यांच्या आमिषाने कोल्हापूरच्या एका हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर येथील तक्रारदार युवराज चोंदोबा कांबळे यांना आरोपी गणेश इंगळे याने फोन करून घर पाडताना माझ्या नातेवाईकाला सोन्याचा भरणी सापडली आणि त्यामध्ये साडेतीन किलो सोन्याची नाणी असल्याचं सांगितलं. आणि मी तुम्हाला ओळखतो तुमच्या हॉटेलवर मी जेवण करून एकदा गेलो होतो असं सांगितलं. तर दुसरीकडे ही नाणी बाजारभावापेक्षा कमी दरात, तब्बल 50 लाख रुपयांत विकण्याची तयारी असल्याचे सांगून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर नाण्यांचे फोटो पाठविण्यात आले. व्यवहारापूर्वी तपासणीसाठी देण्यात आलेले एक नाणे सोनाराकडे तपासले असता ते खरे आढळल्याने कांबळे यांचा आरोपीवर पूर्ण विश्वास बसला.
कोल्हापूरहून पातूरला येऊन व्यवहार; नाणी निघाली बनावट..
दरम्यान, विश्वास बसल्यानंतर युवराज कांबळे हे कोल्हापूरहून पातूर येथे आले. नांदखेड फाटा परिसरात 4 जुलै रोजी दोघांमध्ये व्यवहार झाला. यावेळी कांबळे यांनी 15 लाख रुपये रोख आरोपीकडे दिले. ही रक्कम उभी करण्यासाठी त्यांनी घरातील सोने तारण ठेवून बँकेतून गोल्ड टर्म लोन घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पैसे स्वीकारल्यानंतर आरोपीने सुमारे 3 किलो 300 ग्रॅम वजनाची कथित सोन्याची नाणी दिली. मात्र पुढील तपासणीत ही सर्व नाणी बनावट असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याचे सर्व मोबाईल क्रमांक बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत कांबळे यांनी न्यायाची मागणी केली आहे.
पोलीस अधीक्षकांकडे धाव; तातडीच्या कारवाईचे आदेश..
याप्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता तक्रार स्वीकारण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे त्यांनी थेट अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे धाव घेत संपूर्ण प्रकार मांडला. तक्रार ऐकल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पातूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना तीन दिवसांच्या आत अटक करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे तसेच फसवणुकीतील मुद्देमाल जप्त करून फिर्यादीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिल्याची माहिती तक्रारदाराने दिली. त्यानुसार पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आरोपींवर कठोर कारवाई करून आपले 15 लाख रुपये परत मिळावेत आणि भविष्यात अशा प्रकारची फसवणूक इतर कोणासोबतही होऊ नये, अशी मागणी युवराज कांबळे यांनी केली आहे.