योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक मोठी कारवाई केली आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणि शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
थकीत मुद्रांक शुल्काची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात ही लाच मागण्यात आली होती. लाचखोरांविरोधात एसीबीने रचलेला हा सापळा पूर्णपणे यशस्वी ठरला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराचा अकोला एमआयडीसी परिसरात एक भूखंड आहे. या भूखंडावरील थकीत मुद्रांक शुल्काची (स्टॅम्प ड्युटी) रक्कम निश्चित करून ती भरण्यासाठी तक्रारदार संबंधित कार्यालयाचे अनेक दिवसांपासून चकरा मारत होते. काही दिवसांनी त्यांना थकीत शुल्काची एकूण रक्कम सांगण्यात आली. मात्र, ही शासकीय रक्कम कायदेशीररीत्या कमी करून देतो, असे सांगत मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
( नक्की वाचा : Akola News : अक्षय कुमारची स्टाईल वापरून 25 लाखांची लूट; पण अकोला पोलिसांनी 12 तासांमध्येच केला गेम ओव्हर )
कशी केली अटक?
तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांनी या प्रकाराबाबत थेट अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने आधी तक्रारीची पडताळणी केली, ज्यामध्ये लाच मागितली गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने तातडीने कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे किरण चौधरी यांनी तक्रारदाराकडून 10 हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या लाचखोरीच्या प्रकरणामुळे अकोल्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून एसीबी पुढील तपास करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world