जाहिरात

Akola News : आशादायी चित्र! शिक्षकाचा देशसेवेचा आदर्श; शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यात मोठी मदत

अकोल्यातील शिक्षण क्षेत्रात मानाचं स्थान निर्माण करणारे शिक्षक मुकुंद पाध्ये आज पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रनिष्ठ कार्यामुळे चर्चेत आले आहेत.

Akola News : आशादायी चित्र! शिक्षकाचा देशसेवेचा आदर्श; शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यात मोठी मदत

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News : अकोल्यातील शिक्षण क्षेत्रात मानाचं स्थान निर्माण करणारे शिक्षक मुकुंद पाध्ये आज पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रनिष्ठ कार्यामुळे चर्चेत आले आहेत. अंजनगाव सुर्जी येथील एका सामान्य शिक्षक कुटुंबात जन्मलेल्या पाध्ये यांनी अत्यंत संघर्षमय परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं. वडील विष्णुपंत पाध्ये यांनी तुटपुंज्या पगारात तिन्ही मुलांना शिक्षण दिले. एमएससी पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी अनेक प्रयत्न करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने मुकुंद पाध्ये यांनी स्वतःचे क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या काही विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज विदर्भातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखला जातो. “प्रत्येक विद्यार्थी खास आहे” या भूमिकेतून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले.

कारगिल युद्धावेळी दाखवलेली संवेदनशीलता..

यादरम्यान, सन १९९९ च्या कारगिल युद्धावेळी संपूर्ण देशात देशभक्तीची भावना उसळली होती. त्याच काळात भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी सरकारने नागरिकांना आर्थिक योगदानाचे आवाहन केले होते. त्या वेळी मुकुंद पाध्ये सरांनी आपल्या एका बॅचची वर्षभराची संपूर्ण फी म्हणजेच तब्बल १ लाख रुपये सैनिक कल्याणासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्या काळात एका सामान्य शिकवणी वर्ग चालवणाऱ्या शिक्षकाने दिलेली ही मदत राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. विशेष म्हणजे ही मदत कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता करण्यात आली होती. त्यांच्या या कृतीमागे सैनिकांविषयी असलेली कृतज्ञता आणि देशसेवेची भावना स्पष्ट दिसून आली होती.

नक्की वाचा - NEET Paper Leak : पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या प्राचार्याला बेड्या! 'नीट' च्या परीक्षेत असा झाला पेपरचा सौदा

एक लाखांपासून एक कोटींपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास...

कारगिल युद्धावेळी दिलेल्या १ लाखांच्या मदतीनंतर तब्बल २६ वर्षांनी शिक्षक मुकुंद पाध्ये यांनी पुन्हा एकदा देशसेवेचा मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. पुणे येथे इंडियन आर्मी सेंट्रल वेलफेयर फंडासाठी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी त्यांनी तब्बल १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या योगदानामुळे सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे. आज पाध्ये एज्युकेशनची धुरा त्यांची मुले आकाश आणि ओंकार पाध्ये समर्थपणे सांभाळत आहेत. “देशसेवा हीच सर्वोच्च सेवा” हा संदेश कृतीतून देणाऱ्या पाध्ये परिवाराचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com