योगेश शिरसाट, प्रतिनिधी
MHT-CET Scorcard Latest Update : अकोल्यात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणात काही तांत्रित हलगर्जीपणा झाला आहे का,याचा शोध घेतला जात आहे.दरम्यान,राज्यात स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील गोंधळाच्या घटना सातत्याने समोर येत असून विद्यार्थी आणि पालकांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे.टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर विविध परीक्षांमध्ये पेपर लिक,तांत्रिक त्रुटी आणि निकालातील विसंगती यांसारख्या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
अनेक विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करून,पालक आर्थिक अडचणींवर मात करून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात.मात्र परीक्षेनंतर निकाल किंवा स्कोअरकार्डमध्येच विसंगती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती निर्माण होते.असाच एक खळबळजनक प्रकार अकोल्यात समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण आहे.
एकाच उमेदवाराला दोन वेगवेगळे पर्सेंटाइल; पालकांमध्ये संभ्रम
अकोल्यातील रुतुजा कैलास पोरे (Application No. 26100655648, Roll No. 2682149305) यांनी MAH-MHT CET (PCM Group) 2026 सेकंड अटेम्ट परीक्षा दिली आहे.विद्यार्थिनीचे स्कोअरकार्ड प्रथम डाउनलोड केले असता त्यामध्ये 85.9583652 असा पर्सेंटाईल स्कोअर (Percentile Score)दिसत होता. मात्र, त्यानंतर पुन्हा त्याच अॅप्लिकेशन नंबर(Application Number) आणि रोल नंबरवरून (Roll Number) स्कोअरकार्ड डाउनलोड केले.
नक्की वाचा >> Latur News: लातूरमध्ये शाळकरी मुलींचा कोण करतोय पाठलाग? एका धक्कादायक घटनेमुळं पालकांची धडधड वाढली
त्यामध्ये 33.9583652 असा पर्सेंटाईल स्कोअर समोर आला.एकाच उमेदवारासाठी दोन वेगवेगळे स्कोअर दिसत असल्याने विद्यार्थिनी व तिच्या पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.प्रवेश प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारची विसंगती विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर आणि करिअरवर गंभीर परिणाम करू शकते.त्यामुळे हा तांत्रिक दोष आहे की प्रशासकीय चूक,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा; विद्यार्थ्यांची मागणी
या प्रकरणी जिल्हाधिकारी,अकोला यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थिनीचा अधिकृत व अंतिम पर्सेंटाईल स्कोअर कोणता आहे,याबाबत लेखी स्पष्टीकरण द्यावे.तांत्रिक त्रूटी असल्यास ती तात्काळ दुरुस्त करून योग्य स्कोअरकार्ड उपलब्ध करून द्यावे आणि प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थिनीचे कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री करावी,अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> Baramati News बारामती हादरलं! पोलीस उपनिरीक्षकासह एकाने महिलेवर केला लैंगिक अत्याचार,पोलीस भरतीचं कनेक्शन समोर
दोन्ही स्कोअरकार्डच्या प्रतीही तक्रारीसोबत जोडण्यात आल्या आहेत.या गंभीर प्रकरणाची राज्य सरकारने आणि संबंधित परीक्षा प्राधिकरणाने तत्काळ दखल घेऊन सत्य परिस्थिती स्पष्ट करावी,तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित अशा त्रुटी पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत आहे.