मुंबई: राज्यभरातील नागरिकांना शासकीय सेवा घरबसल्या मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यात.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील विविध विभागांच्या 996 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर 536 सेवा उपलब्ध आहेत. 90 सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे 343 सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात. या सर्वच सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तसेच ज्या सेवा सध्या ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात त्या सर्व ऑनलाईन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा. येत्या शंभर दिवसात हे काम पूर्ण करा. अनेक सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या नाहीत, त्या सर्व सेवा अधिसूचित करण्यासाठी संबंधित मंत्री आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांना सुमारे 99 टक्के शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या संदर्भातही या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. केस गळती झालेल्या लोकांच्या अन्न आणि पाण्याचे नमुने घेतले आहेत. सकृतदर्शनी हे प्रकार बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. बाधित नागरिकांना औषधे आणि मलम वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे केस गळतीच्या प्रमाणात घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
अशा प्रकारांबाबत आरोग्य विभागाने सतर्क रहावे. तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच अशाच प्रकारच्या घटना वर्धा येथे आढळून येत आहेत. त्याकडेही लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.