शुभम बायस्कार
शिवसेना शिंदे गटाचे अमरावती शहाध्यक्षाचा कारनामा समोर आला आहे. या महाशयाने रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून जवळपास 17 तरुणांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. त्यासाठी त्याने या मुलांसमोर रेल्वेचे खोटे अधिकारीही उभे केले होते. शिवाय मुंबईत रेल्वे हॉस्पिटलमध्ये त्यांची मेडीकलही करून घेतली. आता परिक्षा देण्याची गरज नाही थेट नियुक्ती मिळणार असं स्वप्न ही त्यांना दाखवलं. पण याची वाच्यता कुठे करू नका अशी अटही घातली. नोकरी मिळणार ती ही रेल्वेत त्यामुळे ती मुलंही खुश होती. असं असलं तरी नियुक्ती काही होता होत नव्हती. त्याच वेळी काहींना शंका आली अन् शिंदेंच्या अमरावतीच्या शिलेदाराचा बुरखा फाटला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेल्वे विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष देऊन 17 तरुणांकडून तब्बल 1 कोटी 56 लाख रुपये या शहराध्यक्षाने हडपले . अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी पोलिसात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाचा शहराध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना इसोकार, श्रीकांत फुलसावंदे, विलास जाधव,आणि मॉन्टी उर्फ मेघराजसिंह चव्हाण ठाकूर याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षा आल्यानंतर या विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. नोकरी नाही पण पैसे ही गेले अशी स्थिती या तरुणांची झाली आहे.
मंगेश हेंड यांची अंजनगाव सुर्जी येथील शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना इसोकारसोबत ओळख झाली होती. त्यावेळी मुन्ना इसोकारने मंगेशला नोकरीचं आमिष दाखवलं. मी शिवेसेनेतील एका माजी आमदारासोबत तुमची ओळख करुन देतो. तुला रेल्वेत नोकरी मिळेल. मात्र त्यासाठी तुला पैसे खर्च करावे लागतील. त्याच बरोबर आणखी दहा ते पंधरा उमेदवार लागतील. प्रत्येकाला नोकरीसाठी दहा लाख रुपये खर्च येणार आहे. तो प्रत्येकाला करावा लागेल. इसोकारच्या या सांगण्यावरून मंगेश हेंड यांने अकोट येथील त्यांचे काही नातेवाईक आणि मित्र परिवारातील तरुणांना याबाबत सांगितले.
त्यानंतर मंगेश हेंड यांचा मुन्ना इसोकार यांच्यासोबत व्यवहार सुरू झाला. इसोकार यांच्या सांगण्यावरुन श्रीकांत फुलसावंदे यांच्यासोबत संपर्क साधून काही रक्कम त्याच्याकडे देण्यात आली. तसेच नागपुरातील एका बँकेत 'आरटीजीएस'द्वारे रक्कम जमा केली. त्यानंतर सर्व उमेदवारांना मुंबईतील भायखळा येथील सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल येथे बोलावून उमेदवारांचे मेडिकल केले . आता तुमची पुढील भेट ही रेल्वे अधिकाऱ्या बरोबर अंजनगाव सुर्जी येथे होईल असं त्यांना सांगण्यात आले. तो पर्यंत प्रत्येक तरुणाकडून दहा लाख रुपये घेण्यात आले होते, असं तक्रारीत म्हटलं आहे.
रक्कम दिल्यानंतर आरोपींनी उमेदवारांना सांगितले की, तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही. तुमची नोकरीची ऑर्डर लवकरच निघेल. सर्वांना जॉइनिंग लेटर ही मिळेल. त्यानंतर सर्व उमेदवारांना मुंबईत कामावर रुजू होता येईल. पण पुढे अधिकारी हजर नाही. जे जॉईन करून घेणार आहे ते सुट्टीवर आहेत. ते सुट्टीवरून आल्यावर पुढील प्रक्रीया होईल. अशी टाळाटाळ होवू लागवी. त्यानंतर मुन्ना इसोकारसोबत उमेदवारांनी संपर्क केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवाय तरुणांना खोट्या रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर ही मिटींग करून देण्यात आली होती. फसवणुकीची ही तक्रार दाखल केल्यानंतर हा संपुर्ण प्रकार समोर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world