राहुल तपासे, सातारा
रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यान असलेल्या अत्यंत धोकादायक आंबेनळी घाटात आज पहाटे भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली एक स्कॉर्पिओ कार अनियंत्रित होऊन तब्बल 500 ते 700 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात जिपमधील सर्व 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे सर्व मृत तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी होते.
विशेष म्हणजे, 2018 मध्ये ज्या ठिकाणी दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला होता, त्याच परिसरात ही स्कॉर्पिओ कार दरीत कोसळली आहे.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)
पहाटे पावणेतीन वाजता घडली घडला
मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात आज पहाटे 2.45 वाजताच्या सुमारास घडला. सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुण या स्कॉर्पिओ जिपने प्रवास करत होते. आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत कोसळली. घाटातील अंधार आणि दरीची खोली जास्त असल्याने अपघाताची भीषणता प्रचंड होती.
बचावकार्य सुरू; 2 मृतदेह हाती
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस प्रशासनासह स्थानिक मदत दलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. तरीही शोध व बचाव पथकाला आतापर्यंत 500 ते 700 फूट खोल दरीतून दोन मृतदेह शोधण्यात यश आले आहे. उर्वरित मृतदेह आणि दुर्घटनाग्रस्त स्कॉर्पिओ गाडीचा शोध घेण्यासाठी दरीत शोधमोहीम वेगाने राबवली जात आहे. महाबळेश्वर रेस्क्यू टीम, प्रतापगड टीम, सिस्केप महाड-पोलादपूर, आपदा मित्र आणि स्थानिक बचाव पथके यांच्याकडून बचावकार्य सुरू आहे.
(नक्की वाचा- Fuel Price Hike Today: इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ; चेक करा नवीन दर)
कारमधील तरुणांची नावे
- महेश अनिल पवार (वय 25 वर्षे)
- आदित्य अशोक साळुंखे (वय 21 वर्षे)
- रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25 वर्षे)
- सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20 वर्षे)
- अंश समीर चव्हाण (वय 18 वर्षे)
- उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21 वर्षे)
- अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25 वर्षे)
- नितीन किसन नायकोंडे (वय 35 वर्षे)