Malegaon News: अंबरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती! मालेगावात भाजप-काँग्रेसची युती, इस्लाम पार्टीला देणार पाठिंबा?

Malegaon Municipal Corporation : अंबरनाथ नगरपरिषदेनंतर आता मालेगावमध्येही देशातील आणि राज्यातील दोन कट्टर विरोधक म्हणजेच भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Malegaon Municipal Corporation : मालेगाव महापालिकेत भाजपा आणि काँग्रेसचे युती झाली आहे.
मुंबई:

Malegaon Municipal Corporation : राज्याच्या राजकारणात सध्या अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. अंबरनाथ नगरपरिषदेनंतर आता मालेगावमध्येही देशातील आणि राज्यातील दोन कट्टर विरोधक म्हणजेच भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. एकमेकांवर टोकाची टीका करणाऱ्या या दोन पक्षांनी स्थानिक पातळीवर हातमिळवणी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या दोन्ही पक्षांनी मिळून भारत विकास आघाडी नावाचा नवीन गट स्थापन केला असून त्याची अधिकृत नोंदणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

मालेगाव महापालिकेचे राजकीय समीकरण

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तेची गणिते वेगाने बदलली आहेत. मालेगाव महापालिकेची एकूण सदस्यसंख्या 84 आहे. या निवडणुकीत इस्लाम पक्षाने सर्वाधिक 35 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे एमआयएमने 21 आणि शिवसेना शिंदे गटाने 18 जागांवर विजय मिळवला आहे. 

समाजवादी पक्षाला 6 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे 3 आणि भाजपचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. संख्याबळ कमी असले तरी या पाच नगरसेवकांनी एकत्र येत नवीन गट स्थापन केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत.

( नक्की वाचा : Sunetra Pawar : पडद्यामागची ताकद आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री?; वाचा कसा आहे सुनेत्रा पवारांचा प्रवास )

विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचा दावा

भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष नैसर्गिकरित्या एकमेकांचे विरोधक मानले जातात. मात्र, मालेगावच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भावना या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे. या नवीन आघाडीमुळे महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. 

Advertisement

विशेष म्हणजे, हा काँग्रेस आणि भाजपचा गट आता इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तर मालेगावच्या राजकारणात एक वेगळाच प्रयोग पाहायला मिळू शकतो.

( नक्की वाचा : Sunetra Pawar: सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री! छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, शपथविधीही ठरला? )
 

अंबरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती

यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही असाच धक्कादायक प्रकार घडला होता. तिथे भाजप आणि काँग्रेसने एकत्र येत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली होती आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेला बाजूला सारले होते. 60 सदस्य असलेल्या अंबरनाथमध्ये शिवसेनेने 27 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने 14 आणि काँग्रेसने 12 जागा मिळवल्या होत्या. 

Advertisement

तिथेही या दोन पक्षांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. अंबरनाथमधील त्या घटनेनंतर काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना निलंबित केले होते, ज्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. आता मालेगावमध्येही त्याच अंबरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

इस्लाम पक्ष आणि सेक्युलर फ्रंटचे वर्चस्व

मालेगावमध्ये इस्लाम पक्ष आणि समाजवादी पक्ष यांनी आधीच मालेगाव सेक्युलर फ्रंट नावाने आघाडी केली होती. या आघाडीकडे सध्या मोठे संख्याबळ आहे. आता भाजप आणि काँग्रेसच्या भारत विकास आघाडीने त्यांना साथ दिल्यास महापालिकेतील सत्तेचे चित्र अधिक स्पष्ट होईल. मात्र, राज्यातील वरिष्ठ पातळीवर एकमेकांविरुद्ध लढणारे हे पक्ष स्थानिक पातळीवर सत्तेसाठी एकत्र आल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये मात्र आश्चर्याचे वातावरण आहे.

Advertisement