जाहिरात

Sunetra Pawar : पडद्यामागची ताकद आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री?; वाचा कसा आहे सुनेत्रा पवारांचा प्रवास

Who is Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील धक्कादायक निधनानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात होताना दिसत आहे.

Sunetra Pawar : पडद्यामागची ताकद आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री?; वाचा कसा आहे सुनेत्रा पवारांचा प्रवास
Who is Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राजकारणासाठी नवीन नाहीत, कारण त्यांचे माहेर देखील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहे.
मुंबई:

Who is Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील धक्कादायक निधनानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात होताना दिसत आहे. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर निर्माण केलेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे नाव आता समोर आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिलेल्या संकेतांनुसार, सुनेत्रा पवार या शनिवारी (31 जानेवारी 2026)  उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. हे प्रत्यक्षात घडलं तर, तर महाराष्ट्राला  पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळण्याचा मान मिळेल.

सुनेत्रा पवार यांची कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी

सुनेत्रा अजित पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. त्या राजकारणासाठी नवीन नाहीत, कारण त्यांचे माहेर देखील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहे. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी मंत्री आणि लोकसभा खासदार राहिले आहेत. 

राजकारणात प्रत्यक्ष पद स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सामाजिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. त्यांनी 'एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना करून सेंद्रिय शेती आणि ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी योगदान दिले आहे. यासोबतच त्या बारामतीमधील महत्त्वाच्या संस्थांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या देखील सांभाळत आहेत.

( नक्की वाचा : Sunetra Pawar: सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री! छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, शपथविधीही ठरला? )
 


राजकारणातील प्रवेश आणि वाढता प्रभाव

सुनेत्रा पवार यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश हा तसा अलीकडचा आहे. 2024 मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नसले तरी, त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड केली. 

प्रफुल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्या खासदार म्हणून निवडून आल्या. आता राज्यसभेतील अनुभवानंतर त्यांना थेट राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

( नक्की वाचा : ZP Election 2026 : 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकींची तारीख बदलली; मतदान कधी? वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर )

पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाचा मान

महाराष्ट्राने आजवर अनेक दिग्गज नेते पाहिले आहेत, परंतु राज्याच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या उपमुख्यमंत्रीपदावर आजपर्यंत एकाही महिलेची नियुक्ती झालेली नाही. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यास त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंदवल्या जातील. ही घटना केवळ राष्ट्रवादी काँग्रेससाठीच नव्हे, तर राज्याच्या राजकीय इतिहासातील महिला नेतृत्वाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरू शकते.

सुनेत्रा पवारांसमोरील आव्हाने

अजित पवार यांच्या जाण्याने पक्षात आणि सरकारमध्ये जी जागा रिक्त झाली आहे, ती भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार हा प्रभावी पर्याय पुढे आला आहे. छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांचा विधानसभा मतदारसंघ सांभाळण्यासोबतच संपूर्ण राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील वारसा आणि स्वतःची सामाजिक प्रतिमा यांच्या जोरावर त्या पक्षाला कशा प्रकारे सावरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com