Amravati Airport : येत्या 16 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच अमरावती विमानतळ वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमरावतीच्या विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी फुले, शाहू, आंबेडकर, भाऊसाहेब देशमुख फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनंही करण्यात आली होती. हेच नामकरण प्रकरण आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - Amravati Airport : रेल्वेपेक्षा विमानाने करा प्रवास, अमरावती-मुंबई विमानाचं तिकीट दुरांतो एक्सप्रेसपेक्षा स्वस्त
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावावर महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचा आक्षेप...
अमरावती विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख अलायन्स एअरच्या 16 एप्रिल रोजीच्या निमंत्रण पत्रिकेत करण्यात आला होता. मात्र आता या नावावर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणतर्फे आक्षेप नोंदविण्यात आला आहे. अद्यापपर्यंत विमानतळाच्या नावाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे हे नाव दिलं जाऊ शकत नाही. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने अशा प्रकारे खुलासा केला आहे. या आक्षेपाचा ई-मेल महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने अलायन्स एअरला पाठवला आहे. प्राधिकरणाच्या या आक्षेपामुळे समाजमाध्यमांवर संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे अमरावती विमानतळाचे नामकरण वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.