शुभम बायस्कार, अमरावती:
Amravati Bus Auto Accident: अमरावती जिल्ह्यामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड-राजुरा बाजार रोडवर एस टी बस व ऑटो चा भयंंकर अपघात झाला. या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातामध्ये शाळकरी मुलांचाही समावेश आहे. दुर्घटनेतील जखमींवर वरुड येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अमरावतीमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील वरुड-राजुरा बाजार मार्गावर आज सकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस आणि विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षाची समोरासमोर धडक झाली. भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये शाळकरी मुलांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील काही विद्यार्थी ऑटोरिक्षाने शाळेत जात होते. राजुरा बाजार रोडवर समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र गंभीर दुखापत झाल्याने चौघांनी घटनास्थळीच प्राण सोडले.
या अपघातात अन्य काही विद्यार्थी आणि प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. एसटी बसच्या वेगावर नियंत्रण नसल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे वरुड तालुक्यासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.