Amravati Vidhan Parishad : छाननी प्रक्रियेत मोठा उलटफेर; बंडखोर विप्लव बाजोरियांना सर्वात मोठा झटका

अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत आज एक अत्यंत मोठा उलटफेर पाहायला मिळाला.

जाहिरात
Read Time: 3 mins

शुभम बायस्कार, प्रतिनिधी 

Amravati News : अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत आज एक अत्यंत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. शिवसेना शिंदे गटातून बंडखोरी करत अपक्ष नामांकन दाखल करणाऱ्या माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीअंती रद्द केला आहे. बाजोरिया यांच्या प्रतिज्ञापत्रातील गंभीर तांत्रिक त्रुटींवरून काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी अधिकृत आक्षेप घेतला होता, जो कायदेशीर युक्तिवादानंतर प्रशासनाने मान्य केला.

सर्वांनी संगनमत करून अर्ज बाद केला, न्यायालयात जाणार - विप्लव बाजोरिया

उमेदवारी अर्ज बाद ठरवण्याच्या या धक्कादायक निर्णयानंतर विप्लव बाजोरिया यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी आरोप केला की, "विरोधी उमेदवारांनी आणि सर्वांनी संगनमत करून माझा अर्ज जाणीवपूर्वक बाद केला आहे. हा माझ्यावर झालेला अन्याय असून या विरोधात मी उच्च न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून न्यायालय मला नक्कीच दिलासा देणार आहे." बाजोरिया यांच्या या भूमिकेमुळे आता ही लढाई थेट न्यायालयाच्या दारात पोहोचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Ramdas Athawale : 'हातभट्टीची दारू अधिकृत करा'; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची अजब मागणी

नेमका काय होता आक्षेप?

अधिकृत तक्रार पत्रातील पुराव्यानुसार, विरोधी उमेदवारांनी बाजोरिया यांच्या नामनिर्देशन पत्रावर खालील तांत्रिक मुद्दे उपस्थित केले होते. बाजोरिया यांनी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपूर्ण माहिती शपथेवर नव्हती. मुख्य शपथ केवळ पान क्रमांक ११ वरच संपली होती, तर त्यापुढील परिशिष्टावर शपथेवर योग्य स्वाक्षरी नव्हती. 

नोंदणीकृत शिक्यातील तफावत - नोटरीच्या अधिकृत शिक्यामध्ये केवळ पान क्रमांक १ ते ११ चाच उल्लेख 'शपथेवर' असा करण्यात आला. त्यामुळे पान ११ नंतर जोडलेली कागदपत्रे मुख्य शपथपत्राचा भाग मानली जाऊ शकत नव्हती.

फॉर्म नंबर २६ ची अपूर्णता - परिशिष्ट हा शब्द वापरल्यामुळे त्यातील संपूर्ण भाग शपथेवर असणे निवडणूक नियमांनुसार बंधनकारक होते. मात्र, या तांत्रिक निकषांची पूर्तता न झाल्याने फॉर्म नंबर २६ अपूर्ण ठरला.

३ तासांचा हायव्होल्टेज ड्रामा आणि कायदेशीर युक्तिवाद

या तांत्रिक आक्षेपांनंतर दोन्ही बाजूंच्या कायदेशीर प्रतिनिधी आणि वकिल्यांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर तब्बल तीन तास प्रदीर्घ आणि जोरदार युक्तिवाद चालला. बाजोरिया यांच्या वतीने अर्ज वैध ठरवण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले, मात्र काँग्रेस आणि भाजपच्या वकिलांनी कायदेशीर चौकटीवर बोट ठेवत आक्षेप लावून धरले. ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड प्रशांत देशपांडे यांनी भाजप तर्फे जोरदार बाजू मांडली. अखेर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीनुसार बाजोरियांचा अर्ज नामंजूर करण्याचा मोठा निर्णय दिला.

Advertisement

तूर्तास निवडणूक होणार त्रिरंगी; समीकरणे बदलली

विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद झाल्यामुळे (न्यायालयाचा पुढील निर्णय येईपर्यंत) ते सध्या निवडणूक शर्यतीतून बाहेर पडले आहेत. परिणामी, आधी चौरंगी वाटणारी ही निवडणूक आता त्रिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या निवडणुकीच्या मैदानात मुख्यत्वे खालील तीन उमेदवारांमध्ये थेट लढत रंगणार आहे.

प्रवीण पोटे पाटील (भारतीय जनता पक्ष - महायुती)

हर्षजित देशमुख (काँग्रेस - महाविकास आघाडी)

निलेश विश्वकर्मा (वंचित बहुजन आघाडी)

भाजपचे माजी आमदार प्रवीण पोटे पाटील तिसऱ्यांदा विजयाचा दावा करत मैदान राखणार की महाविकास आघाडीचे हर्षजित देशमुख मुसंडी मारणार, याकडे आता संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, बाजोरिया न्यायालयाकडून दिलासा मिळवून पुन्हा मैदानात उतरतात का, यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असतील.

Advertisement