जाहिरात

Amravati News: अमरावतीत भाजपाचा धमाका; निवडणुकीत हुकलेली संधी आता 'स्वीकृत'मधून पूर्ण! पाहा संपूर्ण यादी

Amravati Municipal Corporation : अमरावती महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

Amravati News: अमरावतीत भाजपाचा धमाका; निवडणुकीत हुकलेली संधी आता 'स्वीकृत'मधून पूर्ण! पाहा संपूर्ण यादी
Amravati Municipal Corporation : भाजपाने या निवडीच्या माध्यमातून एक मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक खेळल्याचे मानले जात आहे.
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati Municipal Corporation : अमरावती महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या एकाच विषयाची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे भाजपचे निष्ठावंत नेते आणि ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. प्रशांत देशपांडे यांची स्वीकृत नगरसेवकपदी झालेली निवड. अमरावती महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा नूतन महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या सभेत एकूण नगरसेवकांच्या संख्येनुसार स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. या निवडीमध्ये भाजपने आपल्या 'पार्टी विथ डिफरन्स' या ब्रीदवाक्याचा प्रत्यय देत, ऐन निवडणुकीत तिकीट कापले गेलेल्या आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय दिला आहे.

भाजपाचा मास्टरस्ट्रोक

भाजपाने या निवडीच्या माध्यमातून एक मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक खेळल्याचे मानले जात आहे. ॲड. प्रशांत देशपांडे हे केवळ पक्षाचे नेते नसून त्यांनी अनेक कठीण प्रसंगांत भाजप कार्यकर्त्यांसाठी न्यायालयीन लढाया लढल्या आहेत. 

आणीबाणीच्या काळात आणि पक्षाच्या अडचणीच्या वेळी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि अमरावती क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख म्हणून त्यांची क्रीडा क्षेत्रात मोठी ओळख आहे. त्यांच्या या दांडग्या अनुभवाचा फायदा आगामी काळात महापालिकेतील कामकाजात भाजपाला होईल असं मानलं जातंय.

( नक्की वाचा : Akola News :'टिपू सुलतान'वरून अकोला महापालिकेत तणाव; पाहा, राजकीय वादात AIMIM नं नक्की काय केलं? )

देशपांडे यांच्या निवडीला एक भावनिक आणि राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी अंबापेठ-गोरक्षण प्रभागातून निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला होता आणि त्यांना जनतेचा मोठा प्रतिसादही मिळत होता. मात्र, राजकीय गणितांमुळे ऐन वेळी त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. 

त्यावेळी राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली होती. आता त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देऊन पक्षाने त्यांच्या निष्ठेचे चीज केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात बिश्नोई गँगची एन्ट्री? भाजप नेत्याला २ कोटींची धमकी अन् राजकीय वर्तुळात थरकाप! )

अन्य स्वीकृत नगरसेवक कोण?

या सर्वसाधारण सभेत केवळ भाजपच नव्हे, तर इतर मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. अमरावती महापालिकेत सध्या भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी, आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांची सत्ता आहे. महापौर श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर सचिन भेंडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपकडून ॲड. प्रशांत देशपांडे आणि संजय तिरथकर यांची निवड झाली, तर राष्ट्रवादीकडून भोजराज काळे आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून संजय हिंगासपुरे यांची नियुक्ती झाली आहे.

विरोधी पक्षांमधूनही महत्त्वाच्या नावांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसतर्फे मिलिंद चिमोटे आणि स्थानिक वृत्तपत्राचे मालक अनिल अग्रवाल यांची निवड झाली. तसेच बसपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांची निवड करण्यात आली असून, एआयएमआयएमकडून सय्यद मूजहर अली यांची वर्णी लागली आहे. या सर्व नियुक्त्यांमुळे आता महापालिकेच्या सभागृहात विविध क्षेत्रांतील अनुभवी चेहरे पाहायला मिळणार आहेत, ज्यामुळे शहराच्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com