जाहिरात

Amravati News: अमरावती महापालिकेत स्वच्छतेवर चर्चा, अन् विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहातच मळली तंबाखू, पाहा VIDEO

Amravati Municipal Corporation : अमरावती महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज (शनिवार, 28 फेब्रुवारी 2026) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Amravati News: अमरावती महापालिकेत स्वच्छतेवर चर्चा, अन् विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहातच मळली तंबाखू, पाहा VIDEO
  Amravati Municipal Corporation : अमरावती महानगरपालिकेतील या प्रकारानं शहरात खळबळ उडाली आहे.
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati Municipal Corporation : अमरावती महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज (शनिवार, 28 फेब्रुवारी 2026) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराच्या स्वच्छतेच्या गंभीर प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरू असताना चक्क विरोधी पक्षनेतेच नियम धाब्यावर बसवून तंबाखूचे सेवन करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मनपाचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांचा तंबाखू मळतानाचा आणि खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सभागृहातील शिस्तीचे उल्लंघन

अमरावती शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेत विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरत होते. मात्र, ज्यावेळी शहराच्या आरोग्यावर आणि स्वच्छतेवर खडाजंगी चर्चा सुरू होती, नेमक्या त्याच वेळी विरोधी पक्षनेते विलास इंगोले हे सभागृहात बसून तंबाखू खाण्यात मग्न होते. 

शासकीय कार्यालयांच्या परिसरात आणि विशेषतः सभागृहासारख्या पवित्र ठिकाणी तंबाखू, धूम्रपान किंवा कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करण्यावर कडक बंदी आहे. अशात जबाबदार पदावर बसलेल्या लोकप्रतिनिधीनेच नियमांचे उल्लंघन केल्याने सभागृहाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

( नक्की वाचा : Amravati News: काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी नडली! अमरावतीच्या राजकारणात भूकंप, बडा मोहरा भाजपाच्या गळाला )

स्वच्छतेच्या कंत्राटावरून सभेत वादंग

ही विशेष सभा प्रामुख्याने अमरावतीच्या स्वच्छतेचे कंत्राट कोणार्क कंपनीला देण्यावरून बोलावण्यात आली होती. या कंपनीला कंत्राट देण्याच्या मुद्द्यावरून सभेत प्रचंड वादंग पाहायला मिळाले. प्रशासनाकडून या प्रक्रियेत काय पारदर्शकता पाळली गेली, असा जाब सत्ताधारी आणि विरोधी गटाचे नेते विचारत होते. 

या सभेला महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, आयुक्त सौम्य शर्मा, भाजपचे गटनेते चेतन गावंडे, प्रशांत देशपांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, सुरेखा लुंगारे, राधा कुरिल, अविनाश मार्डीकर, प्रशांत वानखडे आणि मिलिंद चिमोटे यांच्यासह अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते.

( नक्की वाचा : Akola News: 48 लाखांचा डिजिटल दणका! डॉलरच्या बदल्यात बड्या व्यापाऱ्याला गंडा, अकोल्यातील धक्कादायक प्रकार )

प्रशासकीय नियमांची पायमल्ली

एकीकडे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कंत्राट देण्यावर चर्चा सुरू असताना, दुसरीकडे सभागृहातच अशा प्रकारे तंबाखू सेवन केले जाणे हा विरोधाभास असल्याची चर्चा आता नागरिक करत आहेत. शासकीय नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे हा गुन्हा आहे. 

विलास इंगोले यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकप्रतिनिधींनीच नियमांची अशी पायमल्ली केली, तर सामान्य जनतेला काय संदेश जाईल, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

इथे पाहा Video

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com