Amravati News: जेवणानतर उलट्या, मळमळ, पोटदुखी... 40 विद्यार्थी रुग्णालयात; आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार

बाधित सर्व विद्यार्थ्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती:

Amravati Food Poisoning:  अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील तब्बल ३० ते ४० विद्यार्थ्यांना अन्नातून  विषबाधा झाल्याची माहिती पुढे येत आहे. रात्रीच्या जेवणातून हा विषबाधेचा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या स्वतः मेळघाट दौऱ्यावर असतानाच ही गंभीर घटना उघडकीस आल्याने प्रशासनाची मोठी धांदल उडाली आहे.

विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा! 

मिळालेल्या माहितीनुसार, टीटंबा येथील शासकीय आश्रमशाळेत सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (ता.२५) रात्रीच्या जेवणानंतर अचानक ३० ते ४० विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच आश्रमशाळा प्रशासनात एकच खळबळ उडाली. बाधित सर्व विद्यार्थ्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Advertisement

Pune Nasrapur Case: 'आम्हाला अंधारात ठेवू नका'; नसरापूर प्रकरणातील पीडित कुटुंबाची सरकारला कळकळीची विनंती

'सेंट्रल किचन'च्या अन्नातून की पाण्यातून? चौकशी सुरू

या आश्रमशाळांमध्ये 'सेंट्रल किचन'मधून जेवणाचा पुरवठा केला जातो. या सेंट्रल किचनमधून परिसरातील ८ ते ९ शाळांना जेवण पाठवले गेले होते. मात्र, इतर शाळांमध्ये असा प्रकार घडला नसून केवळ टीटंबा येथील एकाच शाळेत हा प्रकार उघडकीस आला आहे.  एकादशी असल्याने उपासाचे पदार्थ, दूषित पाणी की अन्नातील बिघाड यामुळे ही विषबाधा झाली? या सर्व बाजूने आता प्रशासनाकडून सखोल तपास केला जात आहे.

कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही; प्रशासनाचे आवाहन

या संपूर्ण घटनेवर प्रकल्प बालविकास अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी माहिती देताना सांगितले की, "सर्व बाधित विद्यार्थ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून कोणाचीही प्रकृती धोक्यात नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. पालकांनी किंवा नागरिकांनी रुग्णालयात विनाकारण गर्दी करू नये," असे आवाहन त्यांनी केले आहे.

मात्र, मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणामागे नक्की कोणाचा हात आहे? सेंट्रल किचनचा दर्जा आणि अन्न सुरक्षेबाबत प्रशासन कधी गंभीर होणार? असा संतप्त सवाल आता स्थानिक पालकांकडून विचारला जात आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणची शिक्षिका रहस्यमयरित्या गायब, 4 दिवसांनी सापडला मृतदेह; पोलिसांनी असा लावला हत्येचा शोध )