Pune Nasrapur Case: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. 29 जून रोजी लागलेल्या या ऐतिहासिक निकालाला आता महिना पूर्ण होत आला आहे. मात्र, इतका गंभीर खटला असूनही उच्च न्यायालयात पुढे काय घडतेय, याबाबत पीडित कुटुंबाला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आल्याची अत्यंत संतापजनक आणि गंभीर बाब समोर आली आहे.
पीडित चिमुकलीच्या वडिलांनी सोशल मीडियावर एक भावुक व्हिडिओ शेअर करत प्रशासकीय उदासीनतेवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. न्याय मिळूनही कायदेशीर प्रक्रियेच्या माहितीपासून वंचित ठेवले जात असल्याने या कुटुंबाची अनिश्चितता आणि वेदना अधिकच वाढली आहे.
माहिती मिळण्याचा अधिकार नाही का? पीडित वडिलांचा सवाल
पीडित मुलीच्या वडिलांनी प्रशासनाला थेट जाब विचारताना म्हटले आहे की, एक महिना उलटून गेला तरी उच्च न्यायालय किंवा सरकारकडून खटल्याच्या सद्यस्थितीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
या काळात पोलीस अधिकारी, सरकारी वकील आणि संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला, परंतु प्रत्येक वेळी अधिकृत पत्र किंवा कागदपत्रे आलेली नाहीत, असेच उत्तर देऊन बोळवण केली जात आहे. ज्यांच्या आयुष्यावर या घटनेचा थेट परिणाम झालाय, त्या कुटुंबाला खटल्याची माहिती का दिली जात नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
( नक्की वाचा : Court News: लैंगिक शोषण गुन्ह्यातील आरोपीशी पीडित तरुणीचा विवाह; कोर्टानं दिली विशेष परवानगी! कारण काय? )
आम्हाला सहानुभूती नको....
पीडित कुटुंबाने स्पष्ट केले आहे कि, ते कोणतीही विशेष सवलत किंवा वेगळी मागणी करत नाहीत. केवळ या प्रकरणातील कायदेशीर घडामोडींची अधिकृत माहिती प्रशासनाने वेळोवेळी द्यावी, इतकीच त्यांची अपेक्षा आहे.
ही अनिश्चितता ही मूळ वेदनेपेक्षाही अधिक त्रासदायक असते. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणात पारदर्शकता ठेवावी आणि कुटुंबाला अंधारात न ठेवता वेळेत माहिती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणची शिक्षिका रहस्यमयरित्या गायब, 4 दिवसांनी सापडला मृतदेह; पोलिसांनी असा लावला हत्येचा शोध )
मराठी सेलिब्रिटींच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र नाराजी
आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सध्या विविध सामाजिक आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर बोलणाऱ्या मराठी सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सच्या भूमिकेवरही बोट ठेवले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अश्रू ढाळून रील्स बनवणाऱ्या सेलिब्रिटींनी नसरापूरच्या निष्पाप चिमुकलीसाठी मात्र एक साधी पोस्ट किंवा न्यायाचा आवाज उठवला नाही.
या सेलिब्रिटींनी तेव्हा संवेदनशीलतेने पाठिंबा दिला असता, तर पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळाला असता. तसेच या प्रकरणी आवाज उठवणाऱ्या अंकिता प्रभू-वालावलकर यांना ट्रोल करणाऱ्यांच्या वृत्तीचाही त्यांनी निषेध केला.
नेमकं काय घडलं होतं?
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत आरोपी भीमराव कांबळे याला अटक केली.
फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून अवघ्या 2 महिन्यांत न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हा राज्यातील सर्वात जलद गतीने लागलेला निकाल ठरला होता. मात्र, आता उच्च न्यायालयातील प्रक्रियेबाबत प्रशासकीय पातळीवर मौन बाळगले जात असल्याने पीडित कुटुंब अजूनही न्यायाच्या अधिकृत माहितीच्या प्रतीक्षेत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world