शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati News : श्रद्धेच्या नावाखाली अध्यात्माचा बुरखा ओढून तब्बल 10 वर्षे एका महिलेचे भयानक शोषण करणाऱ्या एका भोंदू महाराजाचे संतापजनक प्रकरण उघड झालंय.. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आनंदमठ येथील दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज असं या भोंदुबाबाचं नाव आहे. लग्नाचे आमिष दाखवणे,नवऱ्याला सोडायला लावणे आणि मठाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उकळपट्टी करणे, असा या महाराजाच्या काळ्या कृत्याचा इतिहासच आता पोलिसांना समजला आहे. या प्रकरणातील भोंदू रामगिरी महाराज अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
2014 मध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात पीडित महिलेची आणि आरोपीची पहिली भेट झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने महिलेचा विश्वास जिंकला. त्यानंतर ऑगस्ट 2016 मध्ये तिला मठात बोलावून तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार करण्यात आला. हे प्रकरण कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. तिथून पुढे सलग 10 वर्षे भीती दाखवून आणि खोट्या आश्वासनांच्या जाळ्यात ओढून हे शोषण सुरू होते.
( नक्की वाचा : Dombivli News :डोंबिवलीत 73 वर्षांच्या आजीबाईंना 'लिव्ह इन' ची हौस नडली, 57 लाख गेले, बँक खाते रिकामे )
पीडितेचे लग्न झाले तरी या महाराजाची नजर सुटली नव्हती. त्याने महिलेशी संपर्क चालू ठेवून तिला पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. घटस्फोट झाल्यानंतर तिला मठात पत्नीसारखे ठेवण्यात आले. या काळात तिच्याकडून आणि तिच्या माध्यमातून अनेक भक्तांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले आणि ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरले गेले.
मठातून हाकलून दिले
पैसे आणि शोषणाचा वापर संपल्यानंतर आरोपीने पीडितेला मठातून बाहेर काढले. 19 जून 2026 रोजी ती महिला पुन्हा मठात गेली असता, तिला शिवीगाळ करत, मारहाण करून मठातून हाकलून देण्यात आले. तसेच पोलिसांत गेल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही देण्यात आली. मात्र या धमक्यांना न घाबरता पीडितेने अखेर चांदूर रेल्वे पोलीस ठाणे गाठले.
( नक्की वाचा : चिता जळण्यापूर्वी प्रियकराने मंगळसूत्र घालावं! मुंबईच्या IT इंजिनिअरची शेवटची इच्छा, संपूर्ण गावात पेटला वाद )
पीडितेच्या सविस्तर तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी 18 जुलै रोजी रात्री आनंदमठ येथील दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल केला आहे. अध्यात्माच्या आडोशाने सुरू असलेल्या या भोंदूगिरीचा पोलीस आता अधिक तपास करत आहेत.