शुभम बायस्कार. अमरावती
Amravati Police Death News: अमरावती शहर पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या क्युआरटी जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. विजय नागपूरे असं या आत्महत्या करणाऱ्या पोलीस जवानाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावतीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या( शीघ्र कृती दलाच्या) क्यूआरटी जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विजय नागपूरे असे आयुष्य संपवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. पोलीस आयुक्त कार्यालयामध्येच विजय नागपूर याने टोकाचे पाऊल उचलले.
कार्यालयातुन गोळीबाराचा आवाज होताच इतर कर्मचारी धावून गेले असता तोपर्यंत या जवानाचा जीव गेला होता. याबाबतची माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world