शुभम बायास्कर, अमरावती: अमरावतीच्या विभागीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक महत्वाची शस्त्रक्रिया पार पडली. पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका 18 वर्षीय तरुणीच्या पोटातून 10 किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे. ही गुंतागुंतीची आणि अवघड शस्त्रक्रिया कॅन्सर तज्ज्ञ डॉ. भावना सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती येथे एका तरुणीच्या पोटातून 10 किलो वजनाची गाठ बाहेर काढण्यात आली आहे. विभागीय सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. संबंधित तरुणीला मागील 4 वर्षांपासून पोटदुखी आणि पोट फुगण्याचा त्रास होता. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करूनही काही फरक पडत नव्हता.
Ajit Pawar: 'लाईन मारायला जाल तर तुमची लाईनच काढतो, टायर खालीच घेतो' अजित पवारांचा दम
विशेष म्हणजे, तिची मासिक पाळी देखील मागील तीन वर्षांपासून बंद झाली होती, ज्यामुळे तिचे कुटुंबीय अधिकच चिंतेत होते. यादरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांना अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला मिळाला. येथील तपासणीत तरुणीच्या पोटात मोठा गाठीसारखा गोळा असल्याचं स्पष्ट झालं.
दरम्यान, डॉक्टरांच्या पथकानं तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला आणि तब्बल 10 किलोचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे तरुणीला नवजीवन मिळाले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.