शुभम बायस्कार, अमरावती:
Amravati News: अमरावतीच्या वरुड तालुक्यातील पुसली धरण परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या २४ तासांपासून बेपत्ता असलेल्या तीन सख्ख्या भावंडांचे मृतदेह पुसली धरणाच्या पाण्यात आढळून आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वरुड तालुक्यासह जिल्हाभरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे किंवा मासेमारीच्या उद्देशाने ही मुले धरणावर गेली असावीत आणि पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तीन भावंडांचा बुडून मृत्यू, अमरावतीत हळहळ
मिळालेल्या माहितीनुसार, संतोषलाल उईके हे आपल्या कुटुंबासह वरुड तालुक्यातील पुसली परिसरातील मनोहर निमकर यांच्या शेतातील झोपडीत राहून शेतमजुरी करतात. त्यांची तीनही मुले नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील रहिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत होती. सध्या सुट्ट्या असल्याने ही मुले आपल्या आई-वडिलांकडे पुसली येथे आली होती. मृतांमध्ये पंकज संतुलाल उईके (वय १० वर्षे), प्रिया संतुलाल उईके (वय ८ वर्षे) आणि पवन संतुलाल उईके (वय ७ वर्षे) अशी दोन भाऊ आणि एका बहिणीचा समावेश आहे.
रविवारपासून ही तीनही भावंडे अचानक घरातून बेपत्ता झाली होती. पालकांनी आणि स्थानिक गावकऱ्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर सोमवारी (१९ मे) पुसली धरणाच्या जलाशयात या तिघांचेही मृतदेह तरंगताना आढळून आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
उन्हाळ्यात धरणावर आंघोळीसाठी किंवा धरणाच्या काठावर मासे पकडण्यासाठी गेली असताना एकाला वाचवण्याच्या नादात तिघेही बुडाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. एकाच घरातील तीन चिमुरड्यांचा असा अकाली अंत झाल्याने उईके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.