भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कारसमारंभावेळी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरुन नवा वाद सुरु झाला आहे. भूषण गवई यांच्या सत्कारसमारंभाला महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, आणि मुंबई पोलीस आयुक्त गैरहजेर राहिल्याने भूषण गवई यांनी जाहीर कार्यक्रमातून नाराजी व्यक्त केली. यावरुनच आता राजकीय वातावरणही तापले असून विरोधकांनी सरकारला सवाल केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल
"महाराष्ट्राचा सुपुत्र जिद्द आणि चिकाटीने देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी पोहचतो आणि त्याच्याच राज्यात सरकारकडून अपमान होतो ही अत्यंत वाईट घटना आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या सत्ताधाऱ्यांना आणि उच्चपदावर असलेल्या अधिकाऱ्यांना न्यायसंस्थेचा राग आहे का? साधा प्रोटोकॉल पाळता येत नाही? याची जबाबदारी सरकार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी घेणार का? किमान स्पष्ट करावे कोणाची चूक आहे?" असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
तसेच "पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले देशाचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्या दौऱ्यासाठी राज्य शासनातील एकही प्रमुख अधिकारी उपस्थित राहत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. न्यायमूर्ती गवई साहेब महाराष्ट्राचा अभिमान आहेत. राजशिष्टाचारातील या त्रुटी आणि त्यांचा हा अपमान महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभत नाही," असे म्हणत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही नाराजी दर्शवली आहे.
जितेंद्र आव्हाडांना वेगळीच शंका
दरम्यान, सरन्यायाधीशांच्या या अपमानावरुन राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र वेगळीच शंका उपस्थित केली आहे. "महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस भुषण गवई साहेब शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात आले. आज महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यात चीफ जस्टिस साहेबांनी जाहीरपणे इथल्या प्रशासनाला प्रोटोकॉल न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
राज्याचे मुख्य सचिव, D.G.P, आय.जी ,मुंबई पोलिस कमिशनर व इतर अधिकारी असे कोणीच उपस्थित नव्हते. ही संकुचित मनोवृत्ती नाही तर काय आहे ? माझा प्रशासनाला जाहीर सवाल आहे मराठी मातीचा मराठी अभिमानाचा गौरव महाराष्ट्राचे प्रशासन नाही करणार तर कोण करणार? माफी कोण मागणार ? आणी हो जाता जात नाही त्याला जात म्हणतात," असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
(नक्की वाचा- Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)