संकेत कुलकर्णी, पंढरपूर:
Anjangaon Statue Controversy : माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जागेचा अखेर तोडगा निघाला. त्यामुळे सलग तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी अंजनगावात असणारा तणाव निवळला जाणार आहे. तर या निर्णयामुळे लक्ष्मण हाके यांचे आंदोलन यशस्वी ठरले गेले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणारी जागा खेलोबा देवस्थानची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या जागेवरून पुतळा गावातील दुसऱ्या सरकारी जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय मोहोळ येथील बैठकीत करण्यात आला. या बैठकीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे , जिल्हाधिकारी कार्तिकेयन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी , पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , माजी आमदार राजन पाटील यांच्यासह स्थानिक मराठा आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जयकुमार गोरे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही समाजाकडून या घोषणेचे स्वागत झाले. दरम्यान शनिवारी प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत दोन्ही समाज एकत्रित येऊन अंजनगावातील सर्व लोकांना आवडेल अशा जागेची निवड करून पुतळ्याचे स्थलांतर होणार आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके यांचे आंदोलन आता संपुष्टात आले आहे.
हेडर अंजनगाव खेलोबामध्ये नक्की काय घडले होते ?
1. 1 एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला
2. खेलोबा मंदिराच्या शेजारील जागेत हा पुतळा बसवला
3. जागा सरकारी असल्याचा मराठा समाजाचा दावा
4. जमीन खेलोबा मंदिराची असल्याचा धनगर समाजाचा दावा
5. दुसऱ्या समाजाने जागा खेलोबा मंदिराची असल्याचे म्हटले
6. पुतळा हटविणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने भूमिका घेतली
7. 1 तारखेला मध्यरात्री पोलिसांनी मध्यस्थी केली
8. बैठकीनंतर अज्ञातांनी क्रेन लावून पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला
9. यानंतर दोन्ही समाज आमनेसामने आले, दगडफेक झाली
10. पुतळ्याला विरोध नाही मात्र तो इतर ठिकाणी बसवावा अशी समाजाची भूमिका