मंगेश जोशी, प्रतिनिधी
Sanjay Raut Jalgaon Visit : राजकारणाच्या धकाधकीच्या प्रवासात अनेकदा माणुसकीचे दर्शन घडवणारे काही क्षण अनपेक्षितपणे समोर येतात. जळगावच्या अजिंठा विश्रामगृहात असाच एक हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एका वृद्ध शिल्पकाराची कलेप्रती असलेली जिद्द पाहून त्यांचा ताफा थांबवला. एका ज्येष्ठ शिल्पकाराच्या कलेचा सन्मान करत राऊत यांनी केलेल्या कृतीची जळगावमध्ये मोठी चर्चा होत आहे.
नेमकं काय घडलं?
संजय राऊत हे आपल्या जळगाव दौऱ्यावर असताना अजिंठा विश्रामगृहात थांबले होते. तिथून बाहेर पडत असताना त्यांची नजर विश्रामगृहाच्या परिसरात सकाळपासून थांबलेल्या एका वृद्ध व्यक्तीवर पडली. हे गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून शिरूभाऊ कासार हे ज्येष्ठ शिल्पकार होते. आपल्या हातातील लाकडी चौकटीत सजवलेली देखणी बैलजोडी विकण्यासाठी ते तासनतास वाट पाहत उभे होते. राऊत यांनी त्यांच्या हातातील ती कलाकृती पाहिली आणि कारमधून खाली उतरून थेट त्यांच्याजवळ गेले.
कलेची किंमत आणि आपुलकीची चौकशी
शिरूभाऊ कासार यांच्याशी संवाद साधताना राऊत यांनी त्या बैलजोडीच्या प्रतिकृतीची किंमत विचारली. शिरूभाऊंनी मोठ्या आशेने साडेआठ हजार रुपये (8500) किंमत सांगितली. पण, समोर उभ्या असलेल्या नेत्याचा आदर राखत त्यांनी स्वतःहून सवलत देऊ केली. तुम्ही 500 रुपये कमी द्या, असे शिरूभाऊंनी राऊत यांना सांगितले. मात्र, संजय राऊत यांनी कोणतीही घासाघीस न करता, आपल्या जॅकेटच्या खिशातून 8 हजार रुपये काढले आणि आनंदाने ती प्रतिकृती खरेदी केली.
( नक्की वाचा : 'तुझ्यावर सर्वात आधी कारवाई झाली पाहिजे!', मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरला गडकरींचा सज्जड दम; नेमकं काय घडलं? )
शिल्पकाराच्या कलेचा असा झाला सन्मान
ही बैलजोडी केवळ शोभेची वस्तू नव्हती, तर शिरूभाऊंच्या अनेक तासांच्या मेहनतीचे फळ होते. लाकडी चौकटीवर सिरॅमिक पावडरचा वापर करून अत्यंत सुबकपणे ही बैलांची आकृती साकारण्यात आली आहे. आपल्या कलेला योग्य किंमत आणि सन्मान मिळाल्याचे पाहून शिरूभाऊ कासार यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होते. एका मोठ्या नेत्याने कार थांबवून विचारपूस केली आणि आपली कलाकृती विकत घेतली, ही भावनाच त्या वृद्ध शिल्पकारासाठी खूप मोठी होती.

संजय राऊत यांनी खरेदी केलेली ही बैलजोडीची प्रतिकृती आता त्यांच्या संग्रहात असेल, पण त्या निमित्ताने शिरूभाऊ कासार यांच्यासारख्या स्थानिक कलाकाराला मिळालेले बळ अधिक महत्त्वाचे ठरले. राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन, एका वृद्ध कलाकाराच्या डोळ्यातील समाधान टिपणारा हा प्रसंग सोशल मीडियावरही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world