
राकेश गुडेकर, मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकरच्या अपघातांची मालिका सुरूच असून, आज (4 ऑगस्ट 2025) रत्नागिरी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गॅस टँकरचे अपघात झाले. विशेष म्हणजे, एकाच दिवशी झालेले हे दोन अपघात महामार्गाच्या धोकादायक स्थितीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहेत. सकाळी निवळी-गणपतीपुळे मार्गावर येथे गॅस टँकरचा अपघात झाल्यानंतर, हातखंबा येथेही सकाळी एक HP गॅस टँकर पलटी झाला. यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी महामार्ग रोखून धरत ठेकेदारांसह गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
एकाच दिवसात दोन अपघात
आज सकाळी रत्नागिरीतील निवळी येथे गॅस टँकरचा अपघात झाला. ही घटना ताजी असतानाच काही वेळातच हातखंबा येथे एचपी गॅसचा टँकर पलटी झाला. या अपघातात टँकरखाली येऊन वडापावची गाडी चिरडली गेली, ज्यात दोन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने हातखंबा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच उभ्या असलेल्या जवळपास चार दुचाकी या टँकरने चिरडल्या.
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? नवी तारीख आली समोर, आता सुसाट प्रवास
ग्रामस्थ आक्रमक; ठेकेदाराला धारेवर धरले
हातखंबा येथील अपघातानंतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. याच ठिकाणी गेल्या आठ दिवसांत गॅस टँकरचा हा दुसरा अपघात असल्याने स्थानिकांचा संताप अधिक वाढला होता. संतप्त जमावाने मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे जाणारी वाहतूक ठप्प झाली.
यावेळी ग्रामस्थांनी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार ईगल कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महामार्गाची खराब स्थिती, वळणे आणि निष्काळजीपणा यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार होणाऱ्या या अपघातांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Mumbai to Goa मुंबईकरांचं स्वप्न होणार पूर्ण, गोवा प्रवास होणार जलद! राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न करत त्यांनी अतिरिक्त पोलीस कुमकही बोलावली. सुमारे पाऊण तासानंतर पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी करून वाहतूक पूर्ववत केली. मात्र, या घटनांमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world