विशाल पुजारी, कोल्हापूर
लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणारी महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसली तर फोटो काढा त्यांची व्यवस्था करू, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केलं होतं. मात्र या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेच झोड उठली होता. मात्र सर्वच स्तरातून वाढती नाराजी पाहून धनंजय महाडिक यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. "माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो", असं महाडिक यांनी ट्वीट केलं आहे.
धनंजय महाडिक यांनी आपल्या माफिनाम्यात म्हटलं की, "सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषतः वोट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे."
"मी माझ्या वैयक्तिक, राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नीमार्फत गेली अनेक वर्षे भगीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच चांगले काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणबाबत माझ्या ह्या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाई चरणी मी प्रार्थना करतो", असंही महाडिक यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते धनंजय महाडिक?
धनंजय महाडिक यांनी म्हटलं की, सरकारने आणलेल्या लाडक्या बहीण योजनेला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र असं असतानाही काँग्रेस याला विरोध करत आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा घेऊन ज्या महिला काँग्रेस रॅलीत सहभागी होतील त्यांचे फोटो काढा. मी त्यांची व्यवस्था करतो. आमच्या योजनेमुळे जर महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे मग यांच्या 3000 रुपयच्या योजनेमुळे काय होणार आहे, असा सवाल महाडिक यांनी केला होता.