मंगेश जोशी, जळगाव
मुक्ताईनगर: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात तळवेल गावाजवळ केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांची रोकड आणि इतर साहित्य लुटल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा दरोडा रात्रीच्या वेळी टाकण्यात आला. दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक पोलीस पेट्रोल पंपावर दाखल झाले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोर त्यांच्या दुचाकीवरून पसार झाले.
(नक्की वाचा- पुणे-नाशिक महामार्गावरील तीनही टोल नाके बंद करा; आमदार सत्यजित तांबे यांची सरकारकडे मागणी)
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. या थरारक पाठलागानंतर पोलिसांनी पाचपैकी 3 दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. मात्र, उर्वरित 2 दरोडेखोर पोलिसांच्या हातून निसटले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
(नक्की वाचा- VIDEO: लोकल ट्रेनमध्ये सीटच्या वादातून महिलेने मारला पेपर स्प्रे; त्यानंतर महिला प्रवाशांनी...)
या घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्याच पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांची कसून चौकशी सुरू केली असून, त्यांच्याकडून इतर गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फरार झालेल्या दरोडेखोरांनाही लवकरच पकडले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.