जाहिरात

Pune Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गावरील तीनही टोल नाके बंद करा; आमदार सत्यजित तांबे यांची सरकारकडे मागणी

आमदार सत्यजित तांबे यांनी हा विषय केवळ आज उपस्थित केला नसून, ते गेल्या काही महिन्यांपासून केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने या समस्येचा पाठपुरावा करत आहेत.

Pune Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गावरील तीनही टोल नाके बंद करा; आमदार सत्यजित तांबे यांची सरकारकडे मागणी

Pune Nashik Highway: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था आणि काँक्रिटीकरणाच्या कामाच्या धीम्या गतीमुळे होणाऱ्या त्रासावर आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत पुणे-नाशिक महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण होत नाही, तोपर्यंत या महामार्गावरील तीनही टोल नाके तातडीने बंद करावेत. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी वाढ झाली असून, नागरिकांना शारीरिक आणि आर्थिक अशा दोन्ही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पूर्वी 3 ते 3.5 तासांत होणाऱ्या पुणे-नाशिक प्रवासाला आता 6 ते 9 तासांचा प्रचंड वेळ लागत आहे. संगमनेर ते पुणे प्रवासासाठी 4 ते 5 तास लागत आहेत, तर 1 तासात होणारा संगमनेर ते नाशिक प्रवास आता 2 तासांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र

आमदार सत्यजित तांबे यांनी हा विषय केवळ आज उपस्थित केला नसून, ते गेल्या काही महिन्यांपासून केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने या समस्येचा पाठपुरावा करत आहेत. त्यांनी 10 जुलै 2025 रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशनात हे काम तातडीने पूर्ण करण्याची ठाम मागणी केली होती. त्यानंतर, 25 जुलै 2025 रोजी त्यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लोकांचा आक्रोश त्यांच्यासमोर मांडला.

यावरही समाधानकारक कार्यवाही न झाल्याने, तांबे यांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा पत्र लिहून या विषयात स्वतः जातीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. पुणे-नाशिक हायवेच्या काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने लोकांना रोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवाला रोजचा होणारा धोका ओळखून आणि त्यांच्या वाहनांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने आमच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, हीच नम्र विनंती असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे. सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com