संकेत कुलकर्णी, पंढरपूर
हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा भक्ती सोहळा असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी कंबर कसली आहे. यंदाच्या वारीत भाविकांना उत्तम सेवा-सुविधा पुरवण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी 'बीबीपीडीआर' (Broadband Public Disaster Response) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण देशात पहिल्यांदाच या कम्युनिटी सिस्टीमच्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग पंढरपूर वारीतून होत असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली आहे.
नेटवर्क जॅम झाले तरी संपर्क तुटणार नाही!
यंदाच्या आषाढी वारीमध्ये पंढरपुरात किमान 30 ते 32 लाख भाविक विठ्ठल दर्शनासाठी येण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्यास मोबाईल नेटवर्क पूर्णपणे जॅम होते, ज्यामुळे पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये संपर्क साधणे कठीण होते. हीच समस्या लक्षात घेऊन सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही 'बीबीपीडीआर' प्रणाली पुढे आली आहे.
(नक्की वाचा- Pimpri Chinchwad News: "आई मी नदीत उडी मारतोय..."; रात्रीच्या वेळी लंडन ब्रिजवर उभं राहून व्हिडीओ कॉल, अन्...)
स्वतंत्र कम्युनिटी सिस्टीम
या तंत्रज्ञानामुळे कितीही लाख लोकांची गर्दी झाली किंवा सर्वसामान्य मोबाईल नेटवर्क ठप्प झाले, तरी प्रशासकीय संपर्कात कोणताही अडथळा येणार नाही. यासाठी एक स्वतंत्र संपर्क लाईन तयार करण्यात आली असून, वारीच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना विशेष 500 मोबाईल फोन दिले जाणार आहेत. याद्वारे प्रशासन, पोलीस आणि इतर विभागांना एकमेकांशी थेट व अखंड संवाद साधता येईल.
(नक्की वाचा- DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)
नाशिक कुंभमेळ्यातही होणार वापर
पंढरपूर वारी हे नेहमीच नवीन तंत्रज्ञानाच्या वापराचे केंद्र राहिले आहे. गेल्या वर्षी पंढरपुरात गर्दी नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच 'एआय' तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला होता. हेच एआय तंत्रज्ञान आता आगामी नाशिकच्या कुंभमेळ्यात देखील वापरले जाणार आहे. त्याच धर्तीवर, यंदा पंढरपूरच्या वारीत राबवला जाणारा हा 'बीबीपीडीआर' सिस्टीमचा प्रयोग यशस्वी ठरल्यास, या आधुनिक दळणवळण प्रणालीचा वापर नाशिकच्या कुंभमेळ्यातही गर्दी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी केला जाण्याची दाट शक्यता आहे.