ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Ashadhi Wari 2026: महाराष्ट्रात सध्या आषाढी वारी दिंडी सोहळा सुरु आहे. विठ्ठल नामाचा गजर करत लाखो वारकरी पंढरीकडे पायी निघाले आहेत. विठ्ठल भेटीची आस लागलेला प्रत्येक वारकरी तहान भुक विसरुन, देह भान विसरुन पंढरीची वाट चालत आहे. या आषाढी वारीमध्ये अनेक दिंड्या सहभागी होत आहेत. या दिंडीमध्ये विठ्ठल भक्तीत रमलेले अनेक वारकरी पाहायला मिळतात. अशीच एक दिव्यांगाची दिंडी तब्बल ४५० किलोमीटरचा प्रवास करुन पंढरीकडे निघाली आहे.
दृष्टिहीनांची विठ्ठल भक्ती.. 450 KM चा प्रवास करुन गाठणार पंढरी
विठ्ठल भक्तीला डोळ्यांची नव्हे तर श्रद्धेची दृष्टी लागते, याचा प्रत्यय देणारी वाशिम येथील संत सूरदास महाराज दिव्यांग पायी वारी आज धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात दाखल झाली आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या या दिंडीत १५ दृष्टिहीन वारकरी आणि त्यांच्या सेवेसाठी ५ स्वयंसेवक सहभागी आहेत.
तब्बल ४५० किलोमीटरचा पायी प्रवास करत हे वारकरी मजल-दरमजल पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. डोळ्यांनी विठ्ठल पाहता येत नसला तरी अंतःकरणातील अखंड श्रद्धा, नामस्मरण आणि भक्तीच्या बळावर हे वारकरी पंढरीची वाट चालत असून, त्यांच्या जिद्दीचा आणि भक्तीभावाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
"विठ्ठल आम्हाला बघतो याचाच आनंद"
"आम्ही विठ्ठलाला बघू शकत नसलो तरी ती विठु माऊली आमच्याकडे बघते याचा आनंद मोठा आहे. आमच्या संपूर्ण प्रवासात माऊली आमच्यासोबत असते, म्हणूनच कोणतेही संकट येत नाही. वरुन धो धो पाऊस कोसळत असला तरी आमच्या मनात विठ्ठलाचा गजर सुरु असतो, अशा सुंदर भावना या वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
(नक्की वाचा: Ashadhi Wari: वारीच्या वाटेवर टाळ अन् घुंगरूचा संगम! गेल्या 32 वर्षापासून लावणी अन् वारकऱ्याची अनोखी परंपरा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world