Ashok Kharat Case Rupali Chakankar News: नाशिकमधील अत्याचारी बाबा कॅप्टन अशोक खरातच्या क्रुर कारनाम्यांची नवनवी प्रकरणे समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याही अडचणी वाढत आहेत. कॅप्टन खरातशी निकटचे संबंध समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, त्यानंतर आता त्यांचे प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात आले आहे.
रुपाली चाकणकरांना आणखी एक दणका..?
कॅप्टन अशोक खरातला पाठिशी घालणाऱ्या रुपाली चाकणकर यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. राष्ट्रवादीमध्येही रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. याच संदर्भात शनिवारी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा दिला असला तरी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी अनेक स्तरावर ही मागणी होतेय, याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
Ashok Kharat: खळबळजनक खुलासा! कॅप्टन खरातकडे तब्बल 52 सातबारे! तहसीलदार, बडे अधिकारी अडकणार
या बैठकीमध्ये रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. 'देवगिरी'वरील पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्यानंतर अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना आणखी एक मोठा दणका बसणार आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचे ट्वीट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधत महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चार नावे सुचवली आहेत. महिला आयोगावर निष्पक्ष भूमिका घेणारी व्यक्ती असावी, याबाबत सुनेत्रा वहिनींनी निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
रोहित पवारांनी सुचवली 4 नावे...
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम'च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे. तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल.हा निर्णय सर्वस्वी मा. सुनेत्राकाकींना घ्यायचाय आणि त्या योग्य निर्णय घेतील, ही अपेक्षा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world