वर्षभरात 30000 तरुणांना नोकऱ्या, अन् 11500 लोकांना..कांदिवलीच्या 'या' कौशल्य विकास केंद्राने केलंय तरी काय?

जाहिरात
Read Time: 3 mins
Employment In India
मुंबई:

Employement In India :  तरुणांच्या रोजगाराबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कांदिवली (पूर्व) येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्राने (ABVKVK) एका वर्षात मल्टी-स्किल्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (MSTI) आणि प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून जवळपास 30000 तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलीय. तर 11500 तरुणांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षित केलं आहे.भारताला जगातील स्कील कॅपिटल (Skill Capital)बनविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. तर केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या संकल्पनेतून सुरु झालेलं हे केंद्र कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मिती एक आदर्श केंद्र ठरत आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असं की, राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली 7 ऑक्टोबर 2024 रोजी हे केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. आज हे केंद्र राज्य आणि स्थानिक शासनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे साकारलेल्या त्रिसूत्री शासन मॉडेलचे उत्कृष्ट उदाहरण आहे.'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली,एनडीए सरकार देशातील युवकांना आत्मविश्वास,कौशल्य आणि संधी प्रदान करत आहे. कौशल्यविकास हा भारताच्या विकासकथेतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे.आमचे उद्दिष्ट आहे की,कोणताही मेहनती युवक बेरोजगार राहू नये. प्रत्येक व्यक्तीला बदलत्या अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार योग्य कौशल्य शिकण्याची संधी मिळावी. कांदिवलीतील हे केंद्र केवळ मुंबईतील युवकांसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्श केंद्र ठरेल,असं पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Video: प्रसिद्ध मॉडेलने 'त्या' कॉलेजमध्ये केला अश्लील डान्स! विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीमुळे नको ते घडलं...

असे अनेक नवे केंद्र स्थापन करण्याचे नियोजन सुरू आहे, ज्यामुळे उत्तर मुंबई ‘स्किलिंग हब'म्हणून उदयास येईल आणि युवापिढी 2047 पर्यंत ‘विकसित भारत'या पंतप्रधानांच्या संकल्पनेत सक्रिय योगदान देईल.या केंद्राने १०० हून अधिक नामांकित उद्योगसंस्थांसोबत भागीदारी केली असून मायक्रोसॉफ्ट,एचपी,आयटीसी हॉटेल्स,बजाज फिनसर्व्ह,इन्फोसिस,ब्लू स्टार,कॉस्मॉस आणि लॉरिएल यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या साहाय्याने विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण आणि रोजगार सुविधा पुरवल्या जात आहेत.

सायबर सुरक्षा, आयटी/आयटीईएस, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स मॅनेजमेंट, गेमिंग आणि अॅनिमेशन, अपॅरेल आणि टेक्सटाइल्स, ब्युटी अँड वेलनेस आणि व्हाइट गुड्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये उच्च प्रतीचे कौशल्यविकास प्रशिक्षण दिले जात आहे.याशिवाय,या केंद्रात युवकांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये शाश्वत व्यवसाय पद्धतींचा प्रसार केला जात आहे. केंद्रात वयोवृद्धांसाठी वित्तीय गुंतवणुकीविषयी जागरूकता सत्रे,तसेच कांदिवलीतील महिलांसाठी जीवन विमा आणि आर्थिक नियोजनाविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

Advertisement

काय आहेत प्रमुख वैशिष्ट्ये? 

प्रशिक्षण आणि रोजगार: एका वर्षात ३०,००० युवकांना रोजगार व ११,५०० जणांना प्रशिक्षण.

आयटी/आयटीईएस: इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट आणि एमएसएमई अपस्किलिंगद्वारे ८,००० प्रशिक्षणार्थींपैकी ७,००० ना देशभरात रोजगार.

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण: मायक्रोसॉफ्ट आणि एचपी यांच्या सहकार्याने ५०० हून अधिक सहभागी प्रशिक्षित.

सायबरसुरक्षा (DSCI): भारतातील पहिली सर्व-महिला सायबरसुरक्षा बॅच सुरू; वार्षिक ₹५ लाखांपर्यंतच्या प्रारंभिक पगाराच्या संधी.

BFSI (बजाज फिनसर्व्ह): १००% प्लेसमेंट – १,५०० उमेदवार प्रतिष्ठित वित्तीय संस्थांमध्ये कार्यरत.

ग्रीन बिझनेस आणि उद्योजकता: MSME क्षेत्रात शाश्वत व्यवसाय पद्धतींवर भर.

इतर क्षेत्र: ब्युटी अँड वेलनेस (L'Oréal India), वस्त्रोद्योग, व्हाइट गुड्स (Blue Star), गेमिंग व अॅनिमेशन (Cosmos), फॅसिलिटी मॅनेजमेंट.

वरिष्ठ नागरिक सत्र: गुंतवणूक जागरूकता कार्यक्रम.

LIC जीवन विमा सत्र:  ४५० महिलांना आर्थिक नियोजनाविषयी प्रशिक्षण.

केंद्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांसाठी इंग्रजी भाषणकला आणि संगणक साक्षरता कार्यक्रमही सुरू आहेत.
ग्रीन मुंबई समिट २०२५ मध्ये सहभागी झाल्यानंतर केंद्राने हरित अर्थव्यवस्थेशी संबंधित कौशल्य अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तसेच, दिव्यांग व्यक्तींसाठीही मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्रे आयोजित केली गेली आहेत.

अलीकडेच सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडने या केंद्राशी सहकार्याच्या दिशेने चर्चा सुरू केली आहे. पीयूष गोयल यांच्या निवडणुकीनंतर केवळ पाच महिन्यांत उभारलेले हे जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतिक आहे. आज अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र मुंबईतील युवकांना कौशल्य आणि रोजगाराच्या नव्या युगात नेणारे केंद्र म्हणून उभे आहे. लवकरच अशा आणखी केंद्रांमुळे उत्तर मुंबई भारताच्या “स्किल हब” मध्ये रूपांतरित होईल.

Advertisement