शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी असलेल्या पापळ गावापासून यात्रेला सुरुवात होणार आहे. 7 दिवसाची ही यात्रा असणार आहे.
138 किमीचे पायी अंतर पार करीत उंबरडा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे करत यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या ठिकाणी देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या गावात यात्रेचा समारोप होणार आहे.
अधिवेशनामध्ये डझनभर मंत्राच्या बैठका पार पडल्या मात्र कर्जमाफीची तारीख जाहीर झाली नाही. शासन निर्णय निघाला नसल्याने पदयात्रा काढत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. आंदोलनाची धग कायम राहावी, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही पदयात्रा असल्याचंही त्यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Nashik Rain News: नाशिकमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस! 5 धरण ओव्हरफ्लो, जायकवाडीचा पाणीसाठा किती टक्क्यांवर?)
मागील 3 महिन्यात महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवले आहे. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. तसेच राज्यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याची नोंद झाली आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी आम्ही जात, पात, धर्म, राजकीय विचार सर्व बाजूला ठेऊन एकत्र आलो असून शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार आम्ही केला आहे. सर्व जातीधर्मातील लोकांनी एकत्र व्हा, मत कोणालाही द्या पण कर्जमाफीसाठी एक व्हा असे आवाहन माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.
सरकारने कर्जमाफीचा निर्णय करावा
पुढे कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी लढण्याचा निर्धार दिवंगत साहेबराव करपे यांना नमन करून आम्ही करणार आहोत. दिवसरात्र शेतात राबून बळीराजा साऱ्या जगाचं पोट भरण्यासाठी आपला घाम गाळतो, कष्ट करून जीवाचं रान करतो. पण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजावरच उपाशीपोटी झोपायची वेळ सध्या आलीय. शेतकरी स्वतः कष्ट करून आपलं पोट भरतो. फुकट काही मिळायची शेतकऱ्याची कधी अपेक्षा नसतेच. मात्र त्याने कुणाकडे मदतीची याचना करायची? कुणाकडे पदर पसरायचा? आणि म्हणून विठ्ठलाच्या दारात भक्ताला जात, पात, धर्म, रंग नसतो तसाच शेतकऱ्याच्या कपाळावरही फक्त शेतकरीच लिहिलेलं असतं. तेव्हा सरकारने राजकारण बाजूला ठेऊन कर्जमाफीचा निर्णय करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
(नक्की वाचा : पांडुरंगाचं दर्शन घेऊन घरी परतत असताना अघटित घडलं, 51 वारकऱ्यांच्या एसटीचा भीषण अपघात)
भाजी तुमची, भाकर आमची
या पदयात्रेत राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा पदयात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांची एकी दाखवून द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. गावागावात प्रतिकात्मक स्वरुपात शेतकरी सात-बारा बच्चू कडू यांच्याकडे सुपुर्द करणार आहेत आणि आंदोलनास पाठिंब्याचे प्रतिज्ञापत्र देणार आहेत.