शुभम बायस्कार, अमरावती
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडले आहेत. विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मात्र बच्चू कडू यांच्या मनसुब्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडू यांची साथ सोडण्याची शक्यता आहे.
प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या एका पोस्टरवरून अमरावतीमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बच्चू कडू यांचा फोटो राजकुमार पटेल यांच्या पोस्टरवरुन गायब आहे. बच्चू कडू यांच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. आमदार राजकुमार पटेल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राजकुमार पटेल हे अमरावतीच्या धारणी (मेळघाट) विधानसभेचे प्रहारचे आमदार आहेत. 6 ऑक्टोबर रोजी कार्यकर्त्याच्या संवाद बैठकीचं आयोजन राजकुमार पटेल यांनी केलं आहे. या पोस्टरवरुन बच्चू कडू यांचा फोटो गायब आहे.
मेळघाट विधानसभा कार्यकर्ता संवाद बैठकीचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या पोस्टरवर राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र धारणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रोहित पटेल यांचे फोटो आहेत. तर एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो आहे. मात्र बच्चू कडूंचा यांचा फोटो नसल्याने राजकुमार पटेल यांच्या या पोस्टरची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकुमार पटेल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.