Pune Tourism News: पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, आंबेगाव या पश्चिम घाटामध्ये वर्षा सहलीकरिता पर्यटकांची गर्दी होत आहे. यादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
(नक्की वाचा: नागरिकांनीही प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ; भुशी डॅमसारखी परिस्थिती उद्भवली तर कसा कराल बचाव?)
जिल्हाधिकाऱ्यांनी कोणकोणत्या उपाययोजना राबवण्यास सांगितले?
- जिल्ह्यातील नदी, तलाव, धरणे, धबधबे, गड-किल्ले, जंगल आदी पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग, पुरातत्व विभाग व इतर आवश्यक त्या यंत्रणा सोबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी समक्ष भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहणी करावी.
- धबधबे, तलाव, नदी, डोंगराच्या कड्यांवर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करून सुरक्षिततेच्या दृष्टीने काही अंतरावर नियंत्रण रेषा आखावी आणि त्या नियंत्रण रेषेच्या पुढे पर्यटक जाणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात यावी. तेथे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून सूचना फलक लावण्यात यावेत.
- प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य नसलेले संभाव्य आपत्ती प्रवण पर्यटनस्थळे, डोंगरकडे, धबधबे, पाण्याची साठवण असलेले क्षेत्र, ओढे इत्यादी पर्यटकांसाठी बंद करण्यात यावेत आणि अशा ठिकाणी आवश्यक त्या अधिसूचना उपविभागीय दंडाधिकारी यांनी तात्काळ निर्गमित कराव्यात आणि त्याची काटेकारपणे अंमलबजावणी करावी.
- भूशी, पवना लेक, लोणावळा, सिंहगड, माळशेज घाट, तामीनी घाट इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्या ठिकाणी पर्यटकांसाठी 'काय करावे आणि काय करू नये' या बाबतचे सूचना फलक लावावेत.
(नक्की वाचा: अतिउत्साह नडला, एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO)
- महसूल, नगरपालिका,रेल्वे, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आपत्ती प्रवण जलपर्यटनाच्या ठिकाणी पट्टीचे पोहणारे, शोध व बचाव पथक, जीव रक्षक, लाइफ जॅकेटस्, लाइफ ब्वॉईज, रेस्क्यू बोटी इत्यादी व्यवस्था तयार ठेवाव्या. संबंधित उपविभागीय दंडाधिकरी व कार्यकारी दंडाधिकारी यांनी याबाबत संबंधित विभागांशी समन्वय ठेवून या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- गिर्यारोहण, जलपर्यटन इत्यादी ठिकाणी त्या-त्या स्थानिक परिसरातील अशासकीय संस्था, गिर्यारोहक, एनडीआरएफ, यशदा व जिल्हा प्रशासनाद्वारे प्रशिक्षित आपदा मित्र, स्थानिक स्वयंसेवक इत्यादींची मदत घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करावी. त्या ठिकाणी जीवितहानी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्रथोमपचार सुविधा असलेल्या रुग्णवाहिका यांची देखील व्यवस्था करावी.
- बहुतांशी पर्यटनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते व त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. महामार्ग, राज्य महामार्ग स्थानिक रस्त्यांवर होणारी जीवितहानी टाळण्यासाठी राष्ट्रीय महमार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद (बांधकाम विभाग) यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या रस्त्यांबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- उपाययोजनांच्याअंमलबजावणीत कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा आढल्यास संबंधित अधिकारी आणि विभाग प्रमुख हे जबाबदार राहतील.
वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांवर संध्याकाळी 6 वाजेनंतर बंदी
जिल्ह्यातील पर्यटनस्थळी संध्याकाळी 6 वाजेनंतर कोणतीही बंदी नसून केवळ वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांवर संध्याकाळी 6 वाजेनंतर बंदी असेल. पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत विचारणा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळी पर्यटकांना संध्याकाळी 6 वाजेनंतर देखील तेथील नियमानुसार प्रवेश असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
(नक्की वाचा: 'सुंदर' वरून वाद, रणजित निंबाळकरांची हत्या करणारे गौतम काकडे अटकेत)
Lonavala Bhushi Dam | एका क्षणात कसं वाहून गेलं कुटुंब?लोणावळ्यात नेमकं काय घडलं? NDTV मराठी रिपोर्ट