आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed Boat Accident: बीडच्या माजलगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी आहे. तालुक्यातील एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या नदीपात्रात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बोटीला भीषण अपघात झाला आहे. सुमारे 35 हून अधिक भाविक असलेल्या या बोटीचा समतोल बिघडल्याने ती नदीत उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेत दोन महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे.
काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील माजलगाव जवळील पुरुषोत्तमपूरमधील भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी आज या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गोदावरी नदीपात्रातून प्रवास करत असताना अचानक बोटीचा ताबा सुटला आणि ती उलटली. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच जवळपास 35 पेक्षा अधिक भाविक स्वार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बोट उलटताच नदीपात्रात एकच गोंधळ उडाला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी भाविकांनी टाहो फोडला.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये खळबळ! क्लस्टर योजना अडवण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळले; थेट राजकीय नेत्यांवर गुन्हा )
या भीषण दुर्घटनेत प्रमिला राठोड या महिलेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सिंधुबाई मवाळ (रा. महागाव, जिल्हा वाशीम) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस दल आणि प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
या संपूर्ण घटनेची बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. घटनास्थळाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या ठिकाणी प्रशासनाकडून सुरक्षेची आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती, परंतु दुर्दैवाने हा अपघात झाला आणि त्यात महिलेचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश दिले असून चौकशी अहवाल मागवला आहे. या दुर्घटनेत जी कोणती व्यक्ती किंवा यंत्रणा दोषी आढळेल, तिच्यावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
इथे पाहा VIDEO