आकाश सावंत, बीड: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. जोरदार पाऊस अन वादळी वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीमालाचे मोठे नुकसान झाले असून बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. अशातच आता बीड जिल्ह्यामध्ये बोक्या नावाच्या विषाणूमुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात बदलत्या हवामानामुळे अनेक पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असताना बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात ढोबळी मिरचीच्या पिकावर मोठा फटका बसला आहे. विशेषतः दासखेड गावातील शेतकऱ्यांना यंदा "बोका" नावाच्या विषाणूमुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे या विषाणूचा फैलाव झपाट्याने झाला असून, दोनशे एकरहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे.
दासखेड येथील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ढोबळी मिरचीची झाडे विषाणूने संपूर्णपणे नष्ट झाल्यामुळे उपटून फेकण्याचा निर्णय घेतला आहे. पीक पूर्णपणे खराब झाल्यामुळे उत्पादनाचा काहीच फायदा उरलेला नाही. परिणामी, यावर केलेले खर्च वाया गेले आहेत आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापूरकरांना मोठा दिलासा! पुढील 30 वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार)
माळशिरसमध्ये पावसाचे थैमान
माळशिरस तालुक्यात गेल्या सहा दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग केली. परिणामी केळी, डाळिंब , शेवगा, पेरू, उन्हाळी बाजरी अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेली केळीची बाग पावसामुळे पूर्णपणे जमीन दोस्त झाली आहे. संपूर्ण केळीच्या बागा या झोपल्या गेले आहेत. विजांच्या कडकडाटसह झालेला पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने फळ पिकांची मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला दिसून येतोय. तर कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. माळशिरस तालुक्यात गेल्या सहा दिवसांमध्ये सरासरी 17 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
हिंगोली तालुक्यात टोमॅटोचे नुकसान
हिंगोली जिल्ह्यात मागील सहा ते सात दिवसांपासून मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावलेली असून यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच मात्र नुकसान झालं आहे, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बोडखा येथील शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागवड केली होती.. काही दिवसांमध्ये हे टोमॅटो तोडणीला येणार होते मात्र अवकाळी पावसाने संपूर्ण टोमॅटोच्या बागेच नुकसान केला आहे, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे.
(नक्की वाचा- Pune News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; अजित पवारांचा लग्नातील फोटो व्हायरल)
नाशिकमध्ये भाजीपाल्यांचे नुकसान
गेल्या 10 ते 15 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला पिकांना बसला आहे.मनमाड जवळच्या दिलीप सांगळे या शेतकऱ्याने एका एकरात लावलेल्या कोथिंबीर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्या कोथिंबीरीला चांगला भाव मिळत असताना सतत पावसाने ही कोथिंबीर पिवळी पडून ,सडू लागली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हतबल झाला आहे.