आकाश सावंत, बीड:
Beed News: माजलगाव तालुक्यातील पवारवाडी परिसरात असलेल्या जय महेश साखर कारखान्यामुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. कारखान्यातून निर्माण होणारे विषारी केमिकलयुक्त सांडपाणी नियमबाह्य पद्धतीने जवळच्या एका खदानीत सोडण्यात आले. मात्र या सांडपाण्याचा निचरा होऊन ते आजूबाजूच्या शेतजमिनीत आणि विहिरींमध्ये शिरल्याने परिसरातील शेकडो एकर शेती बाधित झाली आहे.
दूषित पाण्यामुळे शेतीचे नुकसान...
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विहिरीतील पाणी दूषित झाल्यामुळे पिकांना पाणी देता येईना. अनेक ठिकाणी पिके अक्षरशः जळून गेली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांवर या प्रदूषणाचा गंभीर परिणाम झाला आहे. इतकेच नव्हे तर, प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Crime News: नवस केल्याचे सांगत शरीरसंबंधास नकार, पत्नीला समजलं पतीचं भयंकर सत्य, पुढे जे घडलं..
दूषित पाणी वापरात आल्याने त्वचारोग, पोटाचे विकार, श्वसनाचे त्रास यासारख्या समस्या वाढल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना याचा अधिक फटका बसत असल्याची माहिती समोर येत आहे. या गंभीर प्रकाराविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या 26 तारखेला जय महेश साखर कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कारखाना प्रशासनावर कारवाईची मागणी....
कारखान्याच्या मनमानी कारभारामुळे आपला जीव धोक्यात आला असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पर्यावरणीय नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड जिल्ह्यातच हा प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.,
दरम्यान, कारखाना प्रशासनावर तातडीने कारवाई करून प्रदूषण थांबवावे, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत, या मागणीसाठी 26 जानेवारी रोजी कारखाना बंद करण्याचा एल्गारच शेतकऱ्यांनी पुकारला आहे.
Mumbai News: मंत्री झेंडावंदन करणार, मुलगा फरार आरोपी; हायकोर्टाने असं झापलं की राज्यभर चर्चा झाली