बीड: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बुधवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे आणि या हत्या प्रकरणातील आरोपी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने बीड जिल्हाची प्रतिमा मलीन झाली आहे. या प्रकरणानंतर दबाव वाढल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यापूर्वी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार यावरूनही मोठं वादळ निर्माण झालं होतं. अखेर अजित पवारांनी या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारत सगळ्या चर्चांना विराम दिला होता. हे सगळं घडल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. साहजिकच धनंजय मुंडे त्यांच्यासोबत दिसणार का ? याची मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र अनेकांना जे वाटत होतं तसंच घडलं आणि धनंजय मुंडे या दौऱ्यात अजित पवारांसोबत दिसले नाहीत. ते कुठे आहेत, ते दौऱ्याला का आले नाहीत असा प्रश्न यामुळे विचारला जाऊ लागला.
मंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी आपली प्रकृती बरी नव्हती असे म्हटले होते. महिनाभरापूर्वी त्यांच्या डोळ्यावरही शस्त्रक्रिया झाली होती. मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने धनंजय मुंडे आराम करायचा असल्याचे सांगून जे गायब झाले ते अजित पवारांच्या दौऱ्यापर्यंत दिसले नव्हते. अजित पवार बीड दौऱ्यावर येणार असल्याने ते दिसतील अशी आशा त्यांच्या समर्थकांना वाटत होती, मात्र त्यांची आशा फोल ठरली.
(नक्की वाचा- Shivsena vs MNS : गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय? शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा)
अजित पवारांच्या दौऱ्यात आपण का नव्हतो, याचे कारण धनंजय मुंडे यांनी दिले आहे. त्यांनी एक ट्विट करत म्हटले आहे की, "उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती.