आकाश सावंत, बीड
Beed News: मारहाणीच्या घटनेने बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांगरनाला, गोरे वस्ती येथील नागनाथ नन्नवरे यांचे काल सायंकाळी 5.15 च्या सुमारास 10 ते 12 अज्ञात लोकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नागनाथ यांना लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करून एका चारचाकी वाहनातून पळवून नेण्यात आले.
नागनाथ नन्नवरे हे आपल्या नातेवाईकाच्या चऱ्हाटा फाटा येथील घरी गेले असताना ही घटना घडली. अचानक आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि गाडीत बसवून पळ काढला. या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण प्रकार काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून, तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
(नक्की वाचा- Nashik News: अनोळखी मुलांना काकूंनी पाणी दिलं; मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून थरकाप उडेल, पाहा VIDEO)
या प्रकरणी नागनाथ नन्नवरे यांची पत्नी दिया नन्नवरे यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीत त्यांनी तीन व्यक्तींसह इतर अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपहरणमागे आपल्या 11 वर्षांपूर्वी सोडलेल्या पहिल्या पतीचा हात असल्याचा संशय दिया नन्नवरे यांनी व्यक्त केला आहे.
(नक्की वाचा- Nagpur News: डिलिव्हरी बॉयचा भयंकर कारनामा, नागपुरातील धक्कादायक VIDEO आला समोर)
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, रात्रीपासूनच आरोपींचा शोध सुरू केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आरोपींना ओळखणे पोलिसांसाठी सोपे होऊ शकते. या प्रकरणातील सत्य काय आहे आणि अपहरणामागचे खरे कारण काय, याचा पोलीस तपास करत आहेत.