Ajit Pawar Refuses Rs 500 Note from Bajrang Sonwane : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी 2 जानेवारी 2026 रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांमध्ये बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी धावपळ सुरू आहे.
या राजकीय वातावरणात उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज म्हणजेच गुरुवारी 1 जानेवारी 2026 रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात वेगवेगळ्या विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळे पार पडले. या कार्यक्रमात बीडमधील अनेक लोकप्रतिनिधींची मांदियाळी पाहायला मिळाली. मात्र, या सगळ्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना दिलेल्या 500 रुपयांच्या नोटेची.
नेमके काय घडले?
बीडमध्ये सहकार भवनच्या इमारतीचे भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पूजेचा विधी सुरू असताना एक मजेशीर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला प्रसंग घडला. पूजेसाठी बसलेल्या अजित पवारांना पुरोहिताला दक्षिणा द्यायची होती. नेमकी हीच वेळ साधत शेजारी बसलेले खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या खिशातून 500 रुपयांची नोट काढली.
सोनावणे यांनी ही नोट प्रथम आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली. संदीप क्षीरसागर यांनी ती पुढे सरकवत आमदार विक्रम काळे यांच्याकडे सोपवली आणि काळे यांनी ती नोट अजित पवारांना देण्याचा प्रयत्न केला.
( नक्की वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटलेच नाहीत? विश्वास पाटील यांचा खळबळजनक दावा,सादर केले पुरावे )
अजित पवारांचा नकार आणि नोटेचा परतीचा प्रवास
विक्रम काळे यांनी जेव्हा ती 500 रुपयांची नोट अजित पवारांसमोर धरली, तेव्हा अजित पवारांनी ती घेण्यास स्पष्ट नकार दिला. 'नको' म्हणत त्यांनी ती नोट नाकारली आणि स्वतः जवळचे किंवा दुसऱ्याकडून घेतलेले पैसे दक्षिणा म्हणून अर्पण केले. अजित पवारांनी नकार दिल्यानंतर ती 500 रुपयांची नोट पुन्हा त्याच मार्गाने परत फिरली.
विक्रम काळे यांनी ती संदीप क्षीरसागर यांना दिली आणि क्षीरसागर यांनी ती पुन्हा मूळ मालक म्हणजेच बजरंग सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केली. गेलेले पैसे पुन्हा खिशात आले हे पाहून बजरंग सोनवणे यांनीही हसतमुखाने ती नोट आपल्या खिशात ठेवून दिली.
सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची प्रचंड चर्चा सुरू आहे. बीडकर आणि नेटिझन्स या व्हिडिओचा आनंद घेत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
बजरंग सोनवणे आणि अजित पवार यांच्यातील हा 'नोटेचा खेळ' आजच्या बीड दौऱ्यातील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. राजकीय अर्थ काहीही असले तरी, या प्रसंगाने उपस्थितांमध्ये मात्र हलकेफुलके वातावरण निर्माण झाले होते.
इथे पाहा संपूर्ण VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world