Beed News : एका रात्रीतून शाळा गायब, चिमुकल्यांवर उघड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ; बीडमध्ये नेमकं काय घडलं?

धक्कादायक घटनेमुळे शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर उघड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली असून, शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, प्रतिनिधी 

Beed News : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गांधणवाडी येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत काही अज्ञात व्यक्तींनी पहाटेच्या सुमारास पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर उघड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली असून, शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, सुमारे चाळीस वर्षांपासून उभी असलेली ही शाळा दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून दुरुस्त करण्यात आली होती. मात्र, रस्त्याच्या अडथळ्याचं कारण पुढे करत काही गावातील व्यक्तींनी पहाटेच इमारत पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पालक आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

Advertisement

रात्रीतून शाळा गायब, विद्यार्थ्यांचे वर्ग उघड्यावर

इमारत पाडल्यामुळे शाळेतील शालेय पोषण आहारासाठी साठवून ठेवलेल्या धान्यावर माती आणि ढिगारा पडल्याने त्याचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेची इमारत नसल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांचे वर्ग उघड्यावर घ्यावे लागत आहेत. उन्हाच्या तीव्रतेत लहान मुलांना बसावे लागत असल्याने पालकांनीही चिंता व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती संबंधित प्रशासन आणि शिक्षण विभागाला देण्यात आली असून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पर्यायी वर्गखोल्यांची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणीही पुढे आली आहे.

नक्की वाचा - Lohagad Fort : 'सीया पॉइंट नव्हे विंचू कडा; लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवा', स्थानिकांसह शिवप्रेमींचा संताप

दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, संबंधित विभागाकडून चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Topics mentioned in this article