आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : एक महत्त्वाची बातमी बीडच्या अंबाजोगाईमधून समोर आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथील एका पत्नीनेच आपल्या पतीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण चर्चेत आहे. यामध्ये एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीची लोहगडावरुन धक्का देत हत्या केली. यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. त्यातच बीडमधील एका पत्नीने पतीची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
पतीची हत्या का केली?
मिळालेल्या माहितीनुसार, पती दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करीत होता. रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने काळ्या वायरने पतीचा गळा आवळून खून केला. आणि त्यानंतर हार्ट अटॅकचा बनाव रचत मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
शरीफ पठाण असं मृत्यू झालेल्या पतीचं नाव आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघडकीस आला. चौकशीत पत्नी नसरीन पठाण गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने पाटोदा गावासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.