Beed News: डोळ्यात स्वप्न, मनात निर्धार! 'तो' धावला पण मध्येच कोसळला, पोलीस भरती वेळचा थरकाप उडवणार प्रसंग

दिपक वाव्हळे हा आपल्या कुटुंबाला आणि वडिलांना आधार देण्यासाठी पोलीस भरतीत नोकरी मिळावी म्हणून तयारी करत होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बीड पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीदरम्यान उमेदवार दिपक भास्कर वाव्हळे यांचा आकस्मिक मृत्यू झाला.
  • प्राथमिक उपचारानंतरही जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले
  • डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार दिपक यांचा मृत्यू तीव्र डीहायड्रेशनमुळे हार्ट अटॅकमुळे झाल्याची शक्यता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बीड:

आकाश सावंत 

जिल्हा पोलीस दलातील 174 रिक्त पदांसाठी आजपासून सुरू झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. मैदानी चाचणीतील 1600 मीटर धाव पूर्ण करत असताना एका उमेदवाराला अचानक भोवळ आली. धक्कादायक म्हणजे  त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परळी तालुक्यातील मांडेखेलचा दिपक भास्कर वाव्हळे हा तरुण मोठ्या आशा आणि स्वप्नांसह भरती प्रक्रियेसाठी बीडला आला होता. सकाळी लवकर सुरू झालेल्या मैदानी चाचणीत तो 1600 मीटर धाव घेत असताना अचानक कोसळला. उपस्थित अधिकारी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

काय घडला प्रकार?
बीड पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. 1600 मीटर धाव पूर्ण केल्यानंतर उमेदवार दिपक वाव्हळे यांची प्रकृती खालावली. संपूर्ण घटनाक्रम पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दुपारी 12:55 वाजता धाव पूर्ण केल्यानंतर ते मेडिकल रूमकडे गेले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून आयव्ही दिले. नाडी कमी असल्याचे लक्षात येताच रुग्णवाहिका बोलावण्यात आली. 1:14 वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.नातेवाईकांना माहिती देऊन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

नक्की वाचा - Dombivali News: 'धुरंधर'चं शुटींग ज्या पुलावर झालं, तो माणकोली पुल पुन्हा चर्चेत, यावेळी कारण काय?

शवविच्छेदना नंतर समोर येईल मृत्यूचं कारण
डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार, तीव्र डीहायड्रेशनमुळे हार्ट अटॅक आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकृत कारणासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. या घटनेनंतर भरती मैदानावर काही काळ स्तब्धता पसरली होती. इतर उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंता व्यक्त होताना बघायला मिळत आहे. पोलीस होवून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचं स्वप्न दिपकने पाहीलं होतं. पण त्याचे हे स्वप्न अपूर्णच राहीलं. त्याच्या या अशा अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल अशा प्रसंग त्यांच्या वाट्याला आला. 

कौटुंबिक परिस्थिती हालाखीची 
बीडच्या परळी तालुक्यातील मांडेखेल येथील भास्कर वाव्हळ यांना दोन मुलं असा परिवार आहे. भास्कर वाव्हळे हे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी एका खाजगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा दिपक वाव्हळे हा आपल्या कुटुंबाला आणि वडिलांना आधार देण्यासाठी  पोलीस भरतीत नोकरी मिळावी म्हणून तयारी करत होता. पोलीस दलात भरती होऊन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी, या उद्देशाने तो मेहनत घेत होता. त्याच्या आकस्मिक निधनाने परळी परिसरात शोककळा पसरली असून मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune News: 'राजकारण खूप खराब!', हात जोडले, डोळे पाणावले, रिलस्टार सरपंचांनी पराभवाचे कारण सांगितले

पोलीस अधीक्षकांचे आवाहन
बीड जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून मैदानी चाचणीसाठी मोठ्या संख्येने उमेदवार पोलीस मुख्यालयात दाखल होत आहेत. उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने जेवण व पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था मुख्यालयातच केली आहे. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे. सर्व उमेदवारांनी पुरेसा आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे आणि शारीरिक तंदुरुस्ती टिकवून चाचणीला सामोरे जावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. प्रशासनाकडून पारदर्शक व सुरळीत प्रक्रियेची खात्री देण्यात आली आहे.