आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील प्रसिद्ध योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या एका शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला जात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून शिक्षण क्षेत्राला धक्का बसला आहे. शाळेच्या कपाटात आक्षेपार्ह साहित्य आढळल्याचा दावा सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला असून या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे.
शाळेत आक्षेपार्ह साहित्याचा साठा?
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय परिसरात योगेश्वरी शिक्षण संस्थेची एक शाळा आहे. या शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांनी थेट शाळा गाठून तिथे चौकशी केली. यावेळी शाळेतील एका कपाटावर एस.आय.एन. चर्च असे नाव असल्याचे दिसून आले.
या कपाटात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारी पुस्तके, जादूटोण्याशी संबंधित वस्तू आणि काही नशेची औषधे असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. हा सर्व प्रकार शाळेतील काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : नाशिकची 'ती' बडी कंपनी 'कॉर्पोरेट जिहाद' चा अड्डा ! मशिदीत ट्रेनिंग ते ऑफिसमध्ये बीफ, वाचा हादरवणारी माहिती )
15 वर्षांपासून सुरू होता प्रकार?
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, संस्थेशी कोणताही संबंध नसलेली गायकवाड नावाची एक व्यक्ती दर रविवारी शाळेच्या परिसरात ख्रिश्चन धर्माची प्रार्थना घेत असल्याचे समोर आले आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा प्रकार छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. शाळा आणि महाविद्यालय ही जागा धर्मप्रसारासाठी नसून शिक्षणासाठी आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आंदोलनाचा आणि आत्मदहनाचा इशारा
सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात जाऊन संस्थाचालकांना या प्रकरणाचा जाब विचारला. या गंभीर प्रकारात सहभागी असलेल्यांवर पुढील 2 दिवसांत कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संस्थेशी संबंध नसलेल्या त्या बाहेरच्या व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. जर ठराविक वेळेत कारवाई झाली नाही, तर संस्थेसमोर धरणे आंदोलन करण्याचा आणि वेळप्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
( नक्की वाचा : Nashik News : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचा धर्मांतरासाठी छळ; नमाजची सक्ती आणि बीफ खाण्याचा दबाव )
संस्थाचालकांचे स्पष्टीकरण आणि चौकशीचे आश्वासन
या प्रकरणाची दखल घेत योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणतीही शिक्षण संस्था किंवा शाळा ही धर्मप्रसाराची जागा नाही, हा विचार संस्थेच्या स्थापनेपासून जपला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रारीनंतर संस्थेने तातडीने चौकशी समिती नेमली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांनाही निवेदने देण्यात आली आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world