आकाश सावंत, बीड
महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांच्या शोषणाचे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे एक अत्यंत विदारक आणि अंगावर काटा आणणारे वास्तव बीड जिल्ह्यातून समोर आले आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ऊसतोड मजूर देवीदास कापसे यांचे पैशांच्या उचलीवरून अपहरण करण्यात आले आणि सलग चार दिवस त्यांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवत त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. या छळादरम्यान पीडित मजुराच्या तोंडात लघुशंका करण्यात आल्याचा अत्यंत घृणास्पद आरोप मुकादमावर करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली असून मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
उचलीच्या वादातून अपहरण आणि क्रूर अत्याचार
पीडित देविदास कापसे हे उमापूर (ता. गेवराई) येथील रहिवासी असून ते कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. त्यांनी घेतलेल्या उचलीच्या पैशांवरून त्यांचे मुकादम गणेश थोरात याच्याशी वाद झाला होता. "उचल परत का देत नाहीस?" या कारणावरून मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या साथीदारांनी मिळून देविदास कापसे यांचे बळजबरीने अपहरण केले.
(नक्की वाचा- Marathwada News: जमिनीतून मोठा गूढ आवाज अन् हादरे; नागरिकांची मध्यरात्री पळापळ, 3 जिल्ह्यांमध्ये खळबळ)
अपहरण केल्यानंतर आरोपींनी देविदास यांना एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले. चार दिवस त्यांना पाणी आणि अन्नाविना ठेवण्यात आले आणि लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. केवळ शारीरिक छळच नव्हे, तर त्यांचा अत्यंत क्रूरपणे मानसिक छळ करत, मानहानि करण्यासाठी आरोपींनी त्यांच्या तोंडात लघुशंका केल्याचा आरोप देवीदास यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सरपंचांच्या मध्यस्थीने सुटका
देविदास गायब झाल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक सरपंचांनी तातडीने मध्यस्थी केली. सरपंचांच्या प्रयत्नांमुळे अखेर चार दिवसांनंतर देविदास कापसे यांची आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यात आली आणि त्यांना गावी आणण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून अंगावर मारहाणीचे गंभीर व्रण आहेत. त्यांना तातडीने बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा- Hingoli News: खाकी डागाळली! दुसरे लग्न रोखण्यासाठी गेलेल्या पत्नीला पोलीस पतीकडून बेदम मारहाण)
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणात पोलिसांच्या उदासीनतेबद्दलही तीव्र संताप व्यक्त होत आहे. देविदास यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या वृद्ध आईने तात्काळ गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला त्यांची कोणतीही तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला आणि त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या भीषण अत्याचारानंतर कापसे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे. मुख्य आरोपी मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या गुंड सहकाऱ्यांवर अपहरण, बेकायदेशीर कैद, अमानुष मारहाण आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी करत आहेत.