पंढरपुरात उमेदवारीवरुन पेच; भगीरथ भालकेच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं

यंदा मात्र भगीरथ भालके प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत. आता थेट महाविकास आघाडीची उमेदवारी नसेल तरीही निवडणूक लढवण्याचा निर्धार भालके यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. पंढरपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वी मोठा पेच निर्माण झाला आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र महाविकास आघाडीने विचार नाही केला तरीही आपण निवडणूक लढणारच आहोत,अशी मोठी घोषणा भगीरथ भालके यांनी केली. 

भगीरथ भालके यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होऊ शकतो. भालके यांच्या व्यतिरिक्त दुसरा उमेदवार महाविकास आघाडीने घोषित केला तर बंडखोरी होऊ शकते. भगीरथ भालके यांना तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत 1 लाख 5 हजार इतकी दुसऱ्या नंबरची मते मिळाली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. 

यंदा मात्र भगीरथ भालके प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत. आता थेट महाविकास आघाडीची उमेदवारी नसेल तरीही निवडणूक लढवण्याचा निर्धार भालके यांनी व्यक्त केला आहे. यासाठी भगीरथ भालके आता संपूर्ण मतदारसंघात 15 दिवसाची जनआशीर्वाद यात्रा काढत आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राजकीय चर्चाला उधाण आले आहे.

काय म्हणाले भगीरथ भालके?

भगीरथ भालके यांनी म्हटलं की, "महाविकास आघाडीकडे अनेकजण इथे इच्छूक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते सर्व विचार करुनच येथील निर्णय घेतील. मुळात ही जागा कुणाला सुटणार महाविकास आघाडीने वरिष्ठ नेते ठरवतील. जनतेच्या पाठिंब्यावर आणि आशीर्वादावर महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी करत आहेत. मात्र माझ्या मागणीचा विचार केला नाही तरी देखील मी निवडणूक लढणार आहे."