अभय भूते, प्रतिनिधी
Bhandara News : शेत ते घरामध्ये अवघं दीड ते दोन किलोमीटरचं अंतर. पावसाळ्यात वैरण भिजू नये म्हणून शेतकरी सेवदेव लगबगीने निघाले. मात्र वैरण घेऊन घरी जात असताना होत्याचं नव्हतं झालं. भंडाऱ्यातील सिल्ली येथे बैलबंडी उलटून शेतकरी सेवदेव वासुदेव माकडे (५१) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना झालेल्या या घटनेने माकडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नक्की वाचा - Pandharpur News : आषाढी वारी पालखी मार्गावर ऐतिहासिक निर्णय; विशेष सभेत मोठा ठराव
भंडारा जिल्ह्यात खरीप मशागतीला सुरुवात झाली असून जनावरांना पावसाळ्यात लागणारे वैरण किंवा चारा (तणस) आणण्यासाठी सेवदेव निघाले होते. ते स्वतःच्या शेतावरून भरून बैलबंडीने घरी परत येत होते. शेत शिवार रस्त्यावर अचानक बैलगाडी अनियंत्रित झाली आणि उलटली. यात सेवदेव मृत्यमुखी पडले. अपघातानंतर बराच वेळ कोणीही त्या रस्त्यावर न गेल्याने घटनेची माहिती घरच्यांना उशीरा कळाली. त्यांच्या सोबतचा एक बैलही फाशी लागलेल्या अवस्थेत आढळला. त्याला वाचण्यात यश आलं आहे.
खरीपाच्या तोंडावर घरचा करता पुरुष गेला...
मृत सेवदेव यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. खरीप हंगामाच्या कामासाठी ते शेतात गेले होते आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. आता खरीप पेरणी आणि कुटुंबाचं भरणपोषण कसं होईल असा प्रश्न कुटुंबीयांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मृत सेवदेव यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. घटनेची नोंद कारधा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.