जाहिरात

Bhandara News: लग्नाच्या घरात सनई-चौघड्यांऐवजी आक्रोश; नवरदेवाने लग्नाआधीच संपवलं आयुष्य!

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील परसोडी येथील नवरदेवाने लग्नाच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पालांदूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Bhandara News: लग्नाच्या घरात सनई-चौघड्यांऐवजी आक्रोश; नवरदेवाने लग्नाआधीच संपवलं आयुष्य!

अभय भुते, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील परसोडी पावळदवना येथे एका तरुणाने लग्नाच्या 4 दिवस आधी आपले जीवन संपवले. राजेश अविनाश भेंडारकर (27) असे या मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमुळे केवळ भेंडारकर कुटुंबच नाही तर संपूर्ण गाव हादरून गेले आहे.

लग्नाची तयारी आणि अचानक घडलेला अनर्थ

राजेशचे लग्न अवघ्या चार दिवसांनंतर म्हणजेच 16 मार्च रोजी एरंडी येथील वैष्णवी दोनोडे हिच्याशी होणार होते. घरात लग्नाची लगबग सुरू होती, पाहुण्यांची ये-जा होती. धक्कादायक बाब म्हणजे लग्नाच्या खरेदीसाठी नवरी मुलगी सुद्धा 11 मार्च रोजी राजेशच्या घरी आली होती, अशी माहिती मिळत आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास राजेशने घराजवळील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली.

(नक्की वाचा-  शासकीय रुग्णालयात रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिली तर खैर नाही! मंत्री हसन मुश्रीफांचा कडक इशारा)

कंपनीत सिक्युरिटी गार्डची नोकरी

राजेश गेल्या 3 वर्षांपासून चंद्रपूर येथील दालमिया कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीला होता. मात्र राजेशने असे टोकाचे पाऊल का उचलेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

(नक्की वाचा-  Beed News: 'मारू नका ना, सोडा त्यांना' ऊसतोड मजुराच्या पत्नीचा टाहो, पण ते मारतच राहीले, Video Viral)

पोलीस तपास आणि गूढ कायम

घटनेची माहिती मिळताच पालांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.  मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. राजेशने इतके टोकाचे पाऊल का उचलले? त्याच्यावर काही मानसिक दडपण होते का? किंवा इतर काही वैयक्तिक कारण होते का? या दिशेने पोलीस तपास करत आहेत. अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com