Bhandara News: घरात आईचे पार्थिव, डोळ्यांत अश्रू... पण मुलाने स्वत:ला सावरत दिला बोर्डाचा पेपर

Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील सुखराम भुसारी या विद्यार्थ्याने आईच्या निधनाचे दुःख बाजूला सारून दहावीचा पहिला पेपर दिला. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने दाखवलेल्या या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभय भुते, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे एका दहावीच्या विद्यार्थ्याने दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही विलक्षण धैर्य दाखवले आहे. परीक्षेच्या आदल्या रात्री आईचे निधन झाले असताना, डोळ्यांत अश्रू आणि मनात जड अंतःकरण घेऊन या विद्यार्थ्याने आपला बोर्डाचा पहिला पेपर दिला.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील सुखराम निदराम भुसारी या विद्यार्थ्यावर परीक्षेच्या आदल्या रात्रीच काळाने घाला घातला. आईचे छत्र हरपलेले असतानाही, सुखरामने कमालीचे धैर्य दाखवत आपला मराठीचा पहिला पेपर दिला.

Advertisement

परीक्षेच्या आदल्या रात्रीच नियतीचा खेळ

सुखरामची आई गेल्या अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होती. शुक्रवारी दहावीचा पहिला पेपर होता आणि दुर्दैवाने गुरुवारी रात्रीच त्याच्या आईची प्राणज्योत मालवली. ज्या आईने आपल्याला शिकवून मोठे व्हावे असे स्वप्न पाहिले, तीच आई परीक्षेच्या वेळी सोबत नसल्याने सुखराम पूर्णपणे खचून गेला होता.

आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सावरले स्वतःला

घरात आईचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत होते, नातेवाईकांचा टाहो सुरू होता, अशा परिस्थितीत सुखरामला सावरणे कठीण होते. मात्र, 'शिकून मोठे व्हावे' हे आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे, या जिद्दीने त्याने स्वतःला सावरले. जिल्हा परिषद हायस्कूल पालांदूर येथे त्याचे परीक्षा केंद्र होते. जड अंतःकरणाने तो केंद्रावर पोहोचला आणि त्याने मराठीचा पेपर पूर्ण केला.

परिसरातून कौतुकाचा वर्षाव

सुखरामने दाखवलेल्या या धैर्याची माहिती मिळताच शिक्षक, गावकरी आणि इतर विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. आईचे निधन होऊनही शिक्षणाप्रती असलेली त्याची निष्ठा आणि जिद्द पाहून सर्वांनी त्याचे कौतुक केले आहे. पेपर झाल्यानंतर तो घरी परतला आणि त्यानंतर त्याच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Topics mentioned in this article